(कागल/समाधान म्हातुगडे)
राज्यात विविध घडामोडी झालेनंतर सरकार स्थापन झाले आहे. सत्ता नसताना काही त्रास होतो हे सर्वांनी अनुभवले आहे त्यामुळे कोणावरही नाराजी व्यक्त न करता राज्यात महायुतीचे सरकार येण्यासाठी युती धर्म पाळून कामाला लागा. युती धर्म पाळणार नाहीत त्यांनी घरी बसावे. वरिष्ठ नेत्यांना त्रास देऊ नये, नाहीतर सहा वर्षासाठी निलंबनाची कारवाई होऊ शकते. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विजयासाठी सर्वांनी काम करावे लागेल. कुणीही ‘नकारात्मक’ बोलायचे नाही. संघटनेची शिस्त म्हणून सर्वांना हे काम करावेच लागेल असा इशारा राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला.
कागल विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा लक्ष्मी टेकडी जवळ असलेल्या रायगड पॅलेस येथे झाला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राज्यातील तिकीट वाटप महायुतीचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री ठरवणार आहेत. कोणाला किती जागा हे दसऱ्यानंतर समजेल. महायुतीत कागल विधानसभेची जागा राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांना मिळालेली आहे. युतीच्या सर्व जागा व्यवस्थित आल्या तर सरकार सत्तेत येते. सत्ता नसल्याची परिस्थिती आपण यापूर्वी पाहिलेली आहे. त्यामुळे मनाविरुद्ध का असेना महायुतीचे काम करावे लागेल. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोणीही एकसंघ आहेत . हे मुख्यमंत्री शिंदे यांचेही कौशल्य आहे. संघटनेची शिस्त पाळावीच लागेल. मंत्री मुश्रीफ सर्वाना न्याय देतील मात्र आम्ही देखील आपल्या पाठीशी आहोत मी आणि खासदार धनंजय महाडिक कागल मध्ये लक्ष देणार आहोत असे स्पष्ट करून मंत्री पाटील म्हणाले, खासदार महाडिक हे राज्याचे उभारते नेतृत्व आहे त्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची मोठी जबाबदारी आहे.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, सध्या कार्यकर्त्यांनी मनामध्ये विचारांमध्ये दुमत ठेवू नये अशा सूचना दिलेल्या आहेत. आपल्याशी निगडित असलेली एक ही व्यक्ती वेगळा विचार करणार नाही निवडणुकीवर परिणाम होईल असा एक ही शब्द वेगळा बोलायचे नाही. आपण प्रक्रियेतील आहोत, जे दिशा देतील तसे काम करू जिल्ह्यातील दहा आमदार महायुतीचे येण्याबाबत शंभर टक्के योगदान द्यावे.
यावेळी तानाजी कुरणे, एकनाथ पाटील, महावीर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य परशुराम तावरे, प्रीतम कापसे, विकास कांबळे, चंद्रकांत सावंत,रिंगणे, विठ्ठल कदम या व इतर मान्यवरांनी भाजपा कार्यकर्त्यांना विचारात घ्यावे.फक्त निवडणुकांसाठी आमचा वापर न करता निवडून आलेनतर देखील महायुती म्हणून प्रत्येक गोष्टीत आम्हाला विचारात घ्यावे. तरच भाजपा संघटन वाढले अशा भावना त्यांनी मनोगतातून व्यक्त केल्या.
यावेळी जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, जिल्हा अध्यक्ष राहुल चिकोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य भूषणदादा पाटील, अशोकराव चराटी, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष अनिता चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
समरजीत यांचा अनादर करू नका….
समरजीत घाटगे भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष होते. ते शाहू महाराजांचे वंशज आहेत.त्यांच्याकडे मनुष्य बळ असल्याने त्यांनी काही ना बरोबर घेऊन तर काहीना बरोबर न घेता काम केले. आता आम्ही स्वतंत्र आहे. सध्या वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ते चुकले असले तरी त्यांचा अनादर व्यक्त करू नका असा त्यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला.