December 23, 2024

दोन दिवसीय ‘निसर्गोत्सव’चे उदघाट्न : टेरेस गार्डन विषयावर आज चर्चासत्र व प्रात्यक्षिक

(कोल्हापूर / समाधान म्हातुगडे)

नवी आरोग्यासाठी सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब अत्यंत गरजेचा आहे कारण रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या वापरातून घेतलेली उत्पादने घातक ठरत आहेत, असे प्रतिपादन शेतीतज्ज्ञ आणि लेखक प्रताप चिपळूणकर यांनी केले.
जागतिक सेंद्रिय दिनाचे औचित्य साधून सेंद्रिय शेती व उत्पादनांबाबत जनजागृती करण्यासाठी येथील राजारामपुरीतील भारत हौसिंग सोसायटीच्या सभागृहात आयोजित दोन दिवसीय “निसर्गोत्सव” या अभिनव कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून शेतीप्रगती मासिकाचे संपादक रावसाहेब पूजारी, अरुण सोनवणे उपस्थित होते. प्रारंभी रोपास पाणी घालून कार्यक्रमाचा सुभारंभ करण्यात आला. चर्चासत्र आणि तज्ञांचे मार्गदर्शन यासह विविध उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे.


श्री. चिपळूणकर म्हणाले, सूक्ष्मजीवांमुळेच पिके आणि झाडांची वाढ व्यवस्थित होत असते मात्र ज्यादा उत्पादनासाठी रासायनिक खते आणि औषधांचा वापर वाढल्याने सूक्ष्मजीव नष्ट होत आहेत. त्यांचे जतन आवश्यक आहे.


सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी व्यापक चळवळ उभारली पाहिजे आणि त्यासाठी सर्वांचे योगदान हवे. सेंद्रिय शेतीतून उत्पादत होणाऱ्या मालाच्या विक्रीसाठी मार्केटिंग व्यवस्थाही बळकट करण्याची नितांत गरज आहे असे मत श्री. पूजारी यांनी व्यक्त केले.

अरुण सोनवणे म्हणाले, शेतीतील रासायनिक खतांच्या वापराने घेतल्या जाणाऱ्या पिकांच्या वापराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून कॅन्सरसारखे अनेक आजार उद्भवत आहेत. त्यांना वेळीच रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. परिणामी विषमुक्त भाजीपाला, अन्नधान्य आणि फळांच्या लागवाडीसाठी सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय होय.
यावेळी किर्लोस्कर ऑईलचे धीरज जाधव, शैला टोपकर, श्री. वासीम यांचीही भाषणे झाली. कार्यकमास राजू माने, डॉ. दिलीप माळी, शरद टोपकर, डॉ. तृप्ती करेकट्टी, सानिया आजगेकर आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक शरद आजगेकर यांनी केले तर प्रताप पाटील यांनी आभार मानले. शीतल कदम यांनी सूत्रसंचालन केले. ‘निसर्गोत्सव’ कार्यक्रम दोन दिवस चालणार असून उद्या (रविवारी) दुपारी तीन वाजता टेरेस गार्डन व घरच्याघरी सेंद्रिय शेती या विषयावर चर्चासत्र होणार असून त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. एन. शिंदे, सुहास वायंगणकर, डॉ. प्रज्वल बत्ताशे, सतिश कुलकर्णी व श्री. निकम सहभागी होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *