December 22, 2024

पुण्यात पुणेकर ग्रामस्थांचा “आम्ही पुणेकर” स्नेहमेळावा उत्साहात

सहा हजारावर गावकऱ्यांची जोरदार उपस्थिती

(पुणे / प्रतिनिधी)

कोल्हापुरात लवकरच आयटी पार्क उभारणार असल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण व विशेष मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. त्यामुळे कोल्हापूरच्या भूमिपुत्रांना मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यातच रोजगार मिळेल, असेही ते म्हणाले. शेंडा पार्कमधील जागा आयटी पार्कसाठी राखीव ठेवली आहे.

पुण्यात भोसरीमध्ये कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील मूळ रहिवासी असलेल्या ग्रामस्थांच्या “आम्ही पुणेकर” स्नेहमेळाव्यात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार सुनीलआण्णा शेळके होते. या मेळाव्याला सहा हजारांवर गावकऱ्यांनी जोरदार उपस्थिती लावली.

भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, येणारी विधानसभेची निवडणूक ही खलनायकी प्रवृत्तीच्या विरोधात आहे. तुम्ही मला गेली २५ वर्षे आमदार केले आहे. माझ्या २५ वर्षाच्या कारकिर्दीला थर्मामीटर लावा. जर मी जनतेच्या थर्मामीटरमध्ये आमदार म्हणून यशस्वी झालो असेल तरच मते द्या. गेल्या ३५-४० वर्षांच्या राजकीय, सामाजिक प्रवासात गोरगरिबाच्या सेवेला प्राधान्य दिले. माझ्याकडे आलेला प्रत्येकजण हसत जाईल, याची काळजी घेतली.

सोंगाड्या कलाकार…….

आमदार सुनीलआण्णा शेळके म्हणाले, मंत्री हसनसाहेब मुश्रीफ हे गोरगरिबांच्या प्रेम आणि पाठबळावर वाढलेले नेतृत्व आहे. राजकीय द्वेषातून ज्यांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास दिला, त्याची परतफेड करायची हीच खरी वेळ आहे. त्यांना सुट्टी देऊ नका. विरोधी उमेदवारही मोठा सोंगाड्या कलाकार आहे.

दुर्दैवी लढाई…..

गोकुळ दूध संघाचे संचालक अमरीशसिंह घाटगे म्हणाले, कागल तालुक्याने टोकाच्या इर्षेचे राजकारणही पाहिले आहे आणि नेत्यांमधील राजकारणापलीकडचे सामंजस्यही पाहिले आहे. परंतु; अलीकडच्या काळात मात्र विरोधक तुरुंगात घालून आपण सत्तेवर स्वार होण्याची लालची मनोवृत्ती खोपवली आहे अशा दुष्ट प्रवृत्तीच्या विरोधात लढायची ही दुर्दैवी वेळ आहे, असे ते म्हणाले.

अभिमानाने उर भरून येतो…

कागल मतदार संघातील लोक मंत्री मुश्रीफसाहेबांच्या कामाचे कौतुक करतातच. पण; कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेरही त्यांचे खूप कौतुक करीत असतात. मी पुण्यात गेली १६ वर्षे राहते. साहेबांच्याबद्दल टीव्हीवर, पेपरमध्ये बातमी येते. तेव्हा माझ्या आजूबाजूला राहणाऱ्या माता- भगिनी मला येऊन सांगतात. त्यावेळी कागलची माहेरवाशिन म्हणून माझा ऊर अभिमानाने भरून येतो, असे सुधा रघुनंदन राजमाने म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

यावेळी केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, सौ. शीतल फराकटे, सतीश पांडुरंग पाटील -बोळावी, स्वप्नील चौगुले -कागल, एकनाथ नार्वेकर – वडगांव, सुभाष पाटील -व्हनाळी, वीरेंद्र भोसले – दौलतवाडी, सौ. सुधा रघुनंदन राजमाने- कागल, डॉ. अभय पाटील- कागल, संतोष संकपाळ, अभिजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी वसंतराव धुरे, नवीद मुश्रीफ, शिरीष देसाई, काशिनाथ तेली, सतीश पाटील- गिजवणेकर, शशिकांत खोत, मनोजभाऊ फराकटे, प्रवीणसिंह भोसले, विकास पाटील- कुरुकलीकर, प्रकाशराव गाडेकर, शिवराज पाटील, शिवाजीराव पाटील-गलगलेकर, शैलेश गाडे- पाटील, दत्तात्रय पाटील- बाचणी, आनंदराव चौगुले -सोनाळी आदी उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक उद्योजक संजय चौगुले- मळगे खुर्द यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. आभार उपमहाराष्ट्र केसरी पैलवान रवींद्र पाटील- बानगे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *