(गारगोटी/ प्रतिनिधी)
राज्य शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा या महत्वाकांक्षी योजनेत भुदरगड तालुक्यातील खानापूरच्या प्राथमिक शाळेचा समावेश झाला असून या शाळेची नुतन इमारत बांधणेसाठी 1 कोटी 57 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या शाळेच्या इमारतीचे बांधकाम पुर्ण झालेले असून खानापूर गावचे सुपूत्र उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते बुधवार, दि.02 ऑक्टोंबर, 2024 रोजी लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.
शासनाच्या धोरणानुसार येथील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक, भौतिक सेवा-सुविधा मिळणार आहेत. राज्य शासनाने राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना भौतिक व पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेमध्ये खानापूर येथील प्राथमिक शाळेचा समावेश झाला असून ही शाळा आता पुर्णत्वास आली असून या शाळेचा लोकार्पण करण्यात येणार आहे.
तसेच राधानगरी विधानसभा मतदार संघातील शासकीय कार्यालये, रुग्णालयांचे नुतनीकरण करण्यात येत असून प्राथमिक शाळांचे देखील नुतनीकरण करण्यासाठी राधानगरी विधानसभा मतदार संघातील शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.