(कागल / प्रतिनिधी)
वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना आंतरराष्ट्रीय दर्जाची स्केटिंग रिंग (स्केटिंग ग्राऊंड) संदर्भात आज कागल येथे त्यांच्या निवासस्थानी ज्ञानप्रबोधनी स्केटिंग क्लबच्या सर्व पालकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.त्यांनी याला हिरवा कंदील दाखवला असून आंतरराष्ट्रीय स्केटिंग ग्राऊंड बनवण्यासंदर्भात कारवाईचे आदेश तत्काळ देण्यात आले आहेत.
स्केटिंग या ऑलिम्पिक खेळाचे शास्त्रशुद्ध व तंत्रशुद्ध मार्गदर्शन गेल्या दहा-बारा वर्षां पासून ज्ञानप्रबोधनी स्केटिंग क्लब मार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी, मुरगुड, कागल येथे सुरू असून शालेय शासकीय स्पर्धांबरोबरच अनेक जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धामध्ये मुले आपले कौशल्य पणाला लावत आहेत व या स्पर्धा मधून कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर चमकवत आहेत. त्याचबरोबर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ,लिमका बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड बुक करणारे खेळाडू घडले आहेत. पण सध्या सदर खेळाच्या सरावासाठी ग्राउंड उपलब्ध नसल्यामुळे स्केटिंग खेळाडू खुल्या रोडवर खेळाचा सराव करत आहे.
राज्य, राष्ट्रीय स्पर्धेचा विचार करता स्पर्धेपूर्वी ह्या सर्व मुलांना स्केटिंग रिंगच्या अभावामुळे बेळगाव, पुणे या ठिकाणी स्केटिंग रिंक चा सराव करण्यासाठी जावे लागते. ते फार खर्चिक व वेळ खाऊ असल्यामुळे त्रासदायक ठरत आहेत. स्केटिंग या ऑलिम्पिक खेळामध्ये जिल्ह्यातील खेळाडू घडण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्केटिंग रिंग ची आवश्यकता आहे. या मागणीसाठी आज ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या सर्व खेळाडू व पालकांमार्फत वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष नितीन दिंडे, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष संजय चितारी, प्रशिक्षक इंद्रजीत मराठे, पालक अमित हावलदार, सागर मोरबाळे, संतोष पोवार, प्रवीण पाटील, निलेश गांगरकर, सागर कोकाटे, दीपक घाटगे, युवराज पोवार, रोहन कांडेकरी, प्रतिभा पाटील, हर्षला हावलदार त्याचबरोबर मोठ्या संख्येने स्केटिंग खेळाडू उपस्थित होते.