(कागल / प्रतिनिधी )
येत्या सन 2024-25 गळीत हंगामासाठी शाहू साखर कारखान्याने 11 लाख मे.टन ऊस गाळपाचे , 11 कोटी युनिट्स वीज निर्मितीचे तर तीन कोटी लिटर्स इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
शाहू कारखान्याच्या ४५ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.नवोदिता घाटगे यांच्या शुभहस्ते व कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व युवराज आर्यवीर घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखाना स्थळावर विधिवत संपन्न झाला.
यावेळी, राजे समरर्जीतसिंह घाटगे म्हणाले,स्व.राजे विक्रमसिंहराजे घाटगे यांनी शाहू ग्रुप आपले कुटुंब मानले होते. माझा ही तोच प्रयत्न आहे.स्व.राजेसाहेब यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणेच व चौकटी प्रमाणे कारखान्याचे व्यवस्थापकीय प्रशासकीय कामकाज आजही सुरू आहे.
शाहू साखर कारखान्याच्या माध्यमातून परिसराचा चांगल्या पद्धतीने कायापालट करता येतो. हे स्व.राजेसाहेब यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.त्यांच्या पश्चात व्यवस्थापनाचे चोख नियोजन, सभासद, शेतकऱ्यांचे सहकार्य, व अधिकारी कर्मचारी यांचे परिश्रमामुळे साखर कारखानदारी अडचणीत असताना सुद्धा शाहू साखर कारखान्याच्या प्रगतीचा आलेख चढता राहिला आहे हे अभिमानाने सांगावेसे वाटते.
व्यासपीठावर उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, सर्व संचालक, संचालिका रेखाताई पाटील, सुजाता तोरस्कर यांच्यासह माजी कार्यकारी संचालक विजय औताडे यांची उपस्थिती होती.
स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केले.कार्यक्रमास शाहू ग्रुप चे सर्व पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऊसाची इतर विल्हेवाट करू नका
स्वागतपर मनोगतात कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी मागील गळीत हंगामाचा आढावा घेतला. हंगाम २०२४-२५बाबत बोलताना ते म्हणाले, व्यवस्थापनाने दिलेली उद्दिष्टपूर्ती सर्व सभासद, शेतकरी ,बंधू -भगिनी यांनी आजपर्यंत केलेल्या सहकार्यामुळे नेहमीच यशस्वी झालेली आहे. त्यामुळे या गळीत हंगामातसुद्धा ही उद्दिष्टपूर्ती साध्य करण्यासाठी सभासद शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाची इतर विल्हेवाट करू नये. संपूर्ण ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवून सहकार्य करावे.