(तिटवे / प्रतिनिधी)
टिपऱ्याचा मधुर आवाजाने उत्साहाला आलेली भरती त्यात ढोली तारा ढोल बाजेच्या तालावर आंबेमातेच्या गजरात शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयामध्ये दांडिया स्पर्धा पार पडली. जल्लोष, उत्साह, मनसोक्त दाद, दांडियाच्या तालावर थिरकणारे प्रेक्षक अशा भारावलेल्या आणि धमाल वातावरणात महाविद्यालयाच्या प्रांगणात ही स्पर्धा संपन्न झाली.
स्पर्धेसाठी महाविद्यालयातील एकूण चौदा संघानी नोंदणी केली होती. त्यापैकी दुर्गामाता ग्रुप यांना प्रथम, रॉयल आय.टी. गर्ल्स द्वितीय आणि राधाकृष्ण ग्रुपला तृतीय क्रमांक मिळाला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालायचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी मार्गदर्शन केले. लेखक, दिग्दर्शक युवराज डवरी व विजय वाइंगडे यांनी परीक्षक म्हणून काम पहिले.
आपल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनींच्या कला गुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा आपण सतत घेत असतो. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासास मदत होते. आणि म्हणूनच आपल्या महाविद्यालयामध्ये आसपासच्या शंभरहून अधिक खेड्यातील विद्यार्थिनी प्रवेश घेतात. आपले हे उपक्रम असेच सुरु राहतील जेणेकरून विद्यार्थिनींना गुणवत्तापूर्वक शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकासाचे धडे मिळतील, असे मत प्राचार्य प्रशांत पालकर यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उदघाटन उपप्राचार्य प्रा. सागर शेटगे यांच्या हस्ते झाले. या दांडिया महोत्सवाचे समन्वयन प्रा. अश्विनी कांबळे यांनी पाहिले. सूत्रसंचालन कु. स्नेहा मगदूम यांनी केले तर आभार विनायक पाटील यांनी मानले. या वेळी, प्रा. वैभव कुंभार व सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.