(विशेष वृत्त/ समाधान म्हातुगडे)
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून कागलच्या राजकीय विद्यापीठात मोठा राजकीय ड्रामा पहायला मिळत आहे. महायुतीकडून मंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारी तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष असलेले समरजित घाटगे यांनी तुतारी हाती घेतल्याने महाविकासकडून त्यांची उमेदवारी फायनल मानण्यात येत आहे. अशातच माजी खासदार संजय मंडलिक यांचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे मंडलिक गट दुखावला आहे.
पराभव हा केवळ मंत्री हसन मुश्रीफ व समरजित घाटगे यांचेमुळे झाला असल्याचा आरोप संजय मंडलिक यांचे पुत्र विरेंद्र मंडलिक यांनी केला आहे. मेळाव्याच्या माध्यमातून गटातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत मुश्रीफ – घाटगे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. कागल मतदारसंघात मंडलिक गटाचे जाळे मोठे आहे. मतदारसंघात लावलेल्या बॅनरबाजीच्या माध्यमातून मंडलिक गटाची खदखद व्यक्त होत असून राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
शिवसेनेकडून विरेंद्र मंडलिक यांना कागल विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यामुळे महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. याचा फायदा नेमका कोणाला होणार हे पाहणे औतस्युक्याचे ठरणार असून कागलच्या राजकीय विद्यापीठात मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून संपूर्ण या मतदार संघाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. ब्युरो रिपोर्ट लाईव्ह 24 तास न्यूज