मुरगुड / प्रतिनिधी – जोतिराम कुंभार
परिसरातील ४० गावांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विशेष बाब म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिल्याची माहिती माजी खासदार प्रा.संजय मंडलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना माजी खासदार मंडलिक म्हणाले ” दीड वर्षापासून मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा यासाठी मी प्रयत्नशील होतो. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे २०२३ मध्ये सादर केलेला प्रस्ताव अमान्य झाला होता.त्यामुळे शासनाच्या निकषानुसार सुधारित फेरप्रस्ताव सादर केला होता.या कामी ॲड. वीरेंद्र मंडलिक, माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, माजी नगरसेवक एस. व्ही. चौगले, दत्तात्रय मंडलिक, दीपक शिंदे, यांच्यासह आजी-माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका व मंडलिक गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी गेले महिनाभर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यास महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार विशेष बाब म्हणून श्रेणीवर्धन करत ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याचा शासन निर्णय घेतल्याची माहिती माजी खासदार मंडलिक यांनी दिली.
पत्रकार परिषदेस माजी नगराध्यक्ष मेंडके, माजी उपनगराध्यक्ष भोसले, माजी नगरसेवक चौगले, किरण गवाणकर , सुहास खराडे, दत्तात्रय मंडलिक, दीपक शिंदे, अनिल राऊत , मारूती कांबळे, राजेंद्र भाट , अक्षय शिंदे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्याने उच्च दर्जाची आधुनिक उपकरणे व साधने उपलब्ध होणार आहेत. तर रुग्णालयास वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ व इतर अधिकारी असा ४९ पदांचा आकृतीबंध मंजूर झाला असून सध्या रुग्णालयात २६ पदे कार्यरत असून २३ नवी पदे निर्माण झाली आहेत. त्याचा मोठा फायदा परिसरातील ४० गावातील सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. अशी माहिती माजी खासदार मंडलिक यांनी दिली.
९ कोटी ५१ लाखाचा निधी मंजूर
मुरगूड च्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यामुळे बांधकाम, यंत्रसामग्री, रुग्णवाहिका, औषधे , उपकरणे या कामांसाठी ९ कोटी ५१ लाखाचा निधी मंजूर झाला असून विस्तारीकरणास तातडीने सुरुवात होणार असल्याची माहिती माजी खासदार मंडलिक यांनी दिली.