December 23, 2024

सेनापती कापशी / प्रतिनिधी


भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेवरून माजी जिल्हा परिषद सदस्य परशुराम तावरे यांची कागल- गडहिंग्लज – उत्तूर विधानसभा मतदारसंघाच्या संयोजक प्रमुख पदी निवड करण्यात आली. भाजपाच्या कागल येथील बैठकीत या निवडीचे पत्र ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष नाथाजी पाटील यांनी तावरे यांना दिले .मेट्रो पार्क कागल चे अध्यक्ष भरत पाटील यांची महायुतीचे भाजपा समन्वयक म्हणून तर कागल तालुका भाजपाध्यक्षपदी एकनाथ पाटील यांच्या निवडीचे पत्रही यावेळी देण्यात आले.
या वेळी प्रवासी नेता माजी आमदार संजय पाटील,महेश जाधव राज्य संघटक यांनी सांगितले की, भाजपा संयोजक हे विधानसभा मतदार संघात फिरून पार्टीची रचना जोमात करून भाजपची ताकत वाढवतील.महायुतीच्या उमेदवाराला विजयी करून पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणायचे आहे.यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत.
निवडीनंतर बोलताना परशुराम तावरे म्हणाले, मी २०१४ साली भारतीय जनता पार्टीच्या वतीने कागल – गडहिंग्लज – उत्तूर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवली. २०१६ ते २०१९ पर्यंत कागल तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून संघटनात्मक उल्लेखनीय काम केले आहे. जिल्हा परिषद सदस्य तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून ही लक्षवेधी कार्य केले आहे. आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने जी जी जबाबदारी दिली ती समर्थपणे पेलली आहे. या कार्याची दखल घेऊनच पक्षाने संयोजक प्रमुख पदी माझी निवड केली आहे.

  जेष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील,खासदार धनंजय महाडिक,माजी आमदार सुरेश हाळवणकर, महेश जाधव, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी कागल -गडहिंग्लज -उत्तूर विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीची पुनर्बांधणी करण्याचे ठरवले असून या निवडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *