December 23, 2024

(बामणी / प्रतिनिधी)
महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना येत्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केला.

बामणी, ता. कागल येथील आर के मंगल कार्यालयात मंगळवार दि. १५ सकाळी झालेल्या कागल, गडहिंग्लज व उतूर मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, कागल विधानसभा मतदारसंघ भाजपा समन्वयक भरत पाटील, कागल तालुका अध्यक्ष एकनाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले, पालकमंत्री झाल्यानंतर मुश्रीफ यांनी आमचा योग्य सन्मान करत
भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांबाबत सकारात्मकतेची भावना ठेवली. विकास कामे व समिती निवडींमध्ये आम्हाला योग्य न्याय दिला.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये समन्वय ठेवून कोणताही गैरसमज होऊ नये यासाठी दक्ष राहू, भाजपाच्या कार्यकर्त्यांना हयातभर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपू, सत्तेच्या काळात निधी वाटप व समिती निवडीमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही. तसेच महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ या नात्याने कार्यरत आहे. यामुळे आपण सुद्धा मोठा भावाप्रमाणे माझ्या पाठीशी उभे रहावे.

संदीप नाथबुवा म्हणाले, भारतीय जनता पार्टी सोडून गेलेल्यांनी आम्हाला निष्ठा शिकवायची गरज नाही. लोकसभा निवडणूकीत त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेले आदेश आमच्यासह अनेक कार्यकर्त्यांना चांगलंच माहिती आहे.

तानाजी कुरणे म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे आम्ही मूळचे कार्यकर्ते आहोत. परंतु गेल्या दहा वर्षात आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. पक्षाने ज्यांना जबाबदारी ती दिली ते पक्ष सोडून गेले.

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तारळे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष अनिता चौगुले, प्रीतम कापसे, शिवाजी मगदूम संतोष बेलवाडे श्रीपती यादव विठ्ठल कदम महावीर पाटील भागवत शेळके विजय लोकरे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी ॲड. अमर पाटील, मृगेंद्र पाटील, लंकेश पांजळकर, राजू सरनाईक, संजय कांबळे, गडडिंग्लज भाजपा महिला पदाधिकारी यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक कागल विधानसभा समन्वयक भरत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन व आभार एम. एम. चौगुले यांनी केले.

भाजपा एक पाऊल पुढे….
येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मुश्रीफांच्या विजयात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा असेल असे सांगत भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले
भाजपचे कार्यकर्ते प्रचारात महायुतीतील घटक पक्षांच्या एक पाऊल पुढे असतील….

………….

बामणी येथील आर. के. मंगल कार्यालयात आयोजित कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळावाप्रसंगी उपस्थित पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील व पदाधिकारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *