December 23, 2024

बेलेवाडी काळम्मा / प्रतिनिधी

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने सन २०२२-२३ या गळीत हंगामातील तोडग्यानुसार अतिरिक्त ऊस बिलापोटी प्रतिटनाला ५० रुपयांप्रमाणे फरक बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मंगळवार दि. २२ पासून आपापल्या बँकांशी संपर्क साधावा. गेल्यावर्षी पालकमंत्री हसन मुश्रीफ, शेतकरी संघटना व जिल्हाधिकारी यांच्यामध्ये झालेल्या तोडग्यानुसार ही रक्कम जमा केली असल्याचे कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय घाटगे यांनी पत्रकात म्हटले आहे. त्या गळीत हंगामाची म्हणजेच सन २०२२-२३ या गळीत हंगामाची एफ. आर. पी. प्रतिटनाला रू. २९०४. ७९ इतकी असून कारखान्याने प्रत्यक्षात प्रतिटनाला रू. तीन हजारांप्रमाणे ऊसदर यापूर्वीच अदा केला आहे.

तसेच; गेल्या गळीत हंगामाची म्हणजेच सन २०२३-२४ मधील एफ. आर. पी. प्रतिटनाला रू. २,६३९.८९ इतकी असून कारखान्याने प्रत्यक्षात गेल्या गळीत हंगामाच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच प्रतिटनाला रु. ३,२५० इतका उसदर यापूर्वीच एकरक्कमी विनाकपात अदा केला आहे.

कारखान्याच्या वतीने दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात पुढे म्हटले आहे, कारखाना प्रशासनाने यावर्षी कामगारांना बोनसपोटी १६.६६ टक्के म्हणजेच दोन पगार अदा करण्याचे ठरविले आहे. कारखान्याने दिवाळीपूर्वी जाहीर केलेल्या वाढीव ऊसदर व बोनसमुळे शेतकऱ्यांसह कामगारांमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण आहे. चालू गळीत हंगाम म्हणजेच सन २०२४- २५ या गळीतासाठी शेतकऱ्यांनी पिकविलेला सर्व ऊस गाळपासाठी कारखान्याकडे पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन या पत्रकात केले आहे. यापुढेही सरसेनापती साखर कारखाना सर्वाधिक ऊस दर देण्यासाठी कटिबद्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *