कागल / प्रतिनिधी
शेतकऱ्यांना त्रासाचा बनणारा शक्तीपीठ महामार्ग अखेर रद्द झाल्याचा अध्यादेश निघाला असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर आज केले. मंत्री मुश्रीफ यांनी ही घोषणा करताच उपस्थित शेतकऱ्यांनी एकच जल्लोष करीत फटाक्यांची आतिषबाजी केली.
कागल येथे आयोजित नियोजन बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी शक्तिपीठ रद्द झाल्याच्या अधिसूचनेची प्रत माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्याकडे सोपवली.
यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, शक्तीपीठ महामार्गामुळे असंख्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी याला प्रचंड मोठा विरोध केला होता. अनेकदा आंदोलनेही केली होती. यामध्ये माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी पुढाकार घेतला होता. हा शक्तिपीठ महामार्ग आज रद्द झाल्याने या सर्वांच्या लढ्याला यश आलं आहे.
मंत्रिमंडळात पाठपुरावा करून हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करू शकलो, याचा मला विशेष आनंद आहे.
माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊन अनेक शेतकरी भूमिहीन होणार होते. या विरोधात आम्ही सर्वांनी लढा उभारला होता. मंत्री मुश्रीफांकडे हा महामार्ग रद्द होण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यांनी जाणीवपूर्वक यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे
यावेळी, केडीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, गोकुळ संचालक युवराज पाटील, नवीद मुश्रीफ,अमरीश घाटगे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, धनराज घाटगे, डी. एम. चौगले, बाळासाहेब तुरंबे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा शितल फराकटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.