गलगले / प्रतिनिधी
गेल्या ३०-३५ वर्षात सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये अखंडपणे कार्यरत आहे. आपण केलेल्या कामाचा लेखा- जोखा घेऊन मी आपल्यासमोर सातव्यांदा आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. मला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
अर्जुनी, गलगले, मेतके, करड्याळ, मुगळी येथील प्रचारार्थ झालेल्या बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत बिजलीच्या संचालक प्रवीणसिंह भोसले तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विकास पाटील कुरुकलीकर, मयूर आवळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, ‘राज्याच्या ग्रामविकास खात्याची जेव्हा माझ्याकडे जबाबदारी आली तेव्हा मतदार संघातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी प्रचंड निधी तर दिलाच, याचबरोबर कागल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आपण आणलेला आहे. यातूनच कागल तालुक्याच्या सर्व बाजूने विकास करण्यात मला यश मिळाले आहे. आपण मतदार संघातील ७५० हून ग्रामदैवंतांचा जीर्णोद्धार केला आहे. याचे आपल्याला आत्मिक समाधान मिळत आहे.
शशिकांत खोत म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ हे हिमालयासारखे नेतृत्व आपल्याला लाभले आहे. परंतु त्यांच्यामध्ये कधीही गर्व नाही प्रत्येकाशी विनयशील वागणारे हे कागल तालुक्याचे श्रावण बाळ आहे या नेतृत्वाला जपणे आणि वाढवणे हे आपले कर्तव्य आहे. मुगळी येथे सरपंच सौ. मेघा पाटील, कु. सानिका पाटील, सौ. अमृता पाटील, सौ. निशा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
अर्जुनी येथे माजी सरपंच युवराज देसाई, सुनील देसाई, तुकाराम देसाई, रणजीत देसाई, राजेंद्र देसाई बाजीराव चौगुले आदी उपस्थित होते. गलगले येथे तालुका संघाचे संचालक डी. पी. पाटील, काका पाटील, के. वाय. पाटील, विलास पाटील, उपसरपंच दत्तात्रय पाटील, सतीश घोरपडे, मारुती मगदूम, आप्पासो पडळकर तर करड्याळ येथे एड. अरुण पाटील, संजय पाटील, दाजीबा कुंभार, तुकाराम अडसूळ, संजय गेंगे, शिवाजी गेंगे आदी उपस्थित होते. मुगळी येथे सदा साखरचे माजी संचालक रामभाऊ सांगले, माजी सरपंच पांडुरंग पसारे, मुकुंद पाटील, बाबासाहेब सांगले, सरपंच सौ. मेघा पाटील, उपसरपंच उदयबाबा पसारे आदी उपस्थित होते.
हे काय तालुका सांभाळणार…
निशा विनोद पाटील म्हणाल्या, ‘माझे सासरे मुकूंद पाटील हे गेली ३०-३५ वर्षे समरजीतसिंह घाटगे गटाचे कट्टर कार्यकर्ते होते. मात्र त्यांनी आमची कधीही चौकशी केली नाही. त्यामुळेच आमची नाळ त्यांच्याशी कधीच जुळली नाही. विरोधक म्हणतात, आम्ही छ. शाहू, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या विचाराचे वारसदार आहोत. पण हसनसाहेब हेच खरे त्यांच्या विचाराचे वारसदार आहेत. विरोधकांना म्हणे परिवर्तन करायचे आहे, पण कागल तालुक्यामध्ये मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी एकही काम शिल्लक ठेवले नाही. त्यामुळे हे काय परिवर्तन करणार? असा सवाल करीत, ज्यांना घर सांभाळता येत नाही ते तालुका काय सांभाळणार? असा घनाघातही सौ. पाटील यांनी केला.
पाठराखण करणारा भाऊराया…
अमृता सुरज पाटील म्हणाल्या, ‘मी पोलीस भरतीसाठी मुंबईला गेले होते. रात्री आमची रहाण्याची सोय होत नव्हती. त्यावेळी मी मुश्रीफसाहेबांना रात्री २.३० वाजता फोन केला. विशेष म्हणजे साहेबांनी फोन घेतला आणि मोबाईल वरूनच आमदार निवासासाठी पत्र मोबाईलवर पाठवले. आम्हा मुलींची राहण्याची सोय केली. अशी बहिणींची पाठराखण करणारे नेते मुश्रीफसाहेब आहेत. हे अगदी त्यांनी भावनाविवश होत सांगितले.