December 23, 2024

प्रा. संजय मंडलिक यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा

(विशेष वृत / समाधान म्हातुगडे )

भारत देश संपूर्ण जगात अव्वल आणि अग्रेसर होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा. त्यासाठी प्रा. संजय मंडलिक यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करा, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

कसबा सांगाव (ता. कागल) जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य व गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील होते.

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, आपल्या देशावर ६८ वर्षे काँग्रेसने केवळ घोषणा करत राज्य केले. काँग्रेसच्या काळात १२ लाख कोटी रुपयांचे घोटाळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. समाजासाठी रस्त्यावर काम करणारे राज्यातील तीन प्रमुख नेते महायुतीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. पक्की घरे, शौचालय, गॅस, मोफत रेशन, आरोग्य यासह विविध योजना मोदी सरकारच्या काळात सुरू झाल्या. विविध योजना आणि सर्वसामान्य जनतेबद्दल असणारा मोदींचा कळवळा देशाच्या हिताचा आहे. त्यांना तिस-यांदा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिकांना प्रचंड मताधिक्य द्या.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, लोकसभा निवडणूक आपल्या देशाचे भवितव्य ठरवणारी आणि देशाला नेतृत्व देण्याचा निर्णय करणारी आहे. गेल्या अनेक वर्षात काँग्रेसला जे सुचले नाही ते पंतप्रधान मोदींनी केले. शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसार सामान्य जनतेपर्यंत पोहचवा. कोणतीही मोठी शक्ती आली तरीही संजय मंडलिक यांना रोखू शकणार नाही. स्व. खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी, त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मंडलिक यांना विजयी करुया आणि स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मृती जागृत ठेवूया. असे आवाहन वैद्यकीय शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोणाची मने दुखावतील अशी भाषणे करु नका. कागल, चंदगडसह राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातील बाहेरील मतदार आणण्यावर भर देऊया. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. कागल तालुक्याचे लीडच मंडलिकांना विजयी करेल.

संजय मंडलिक म्हणाले, कितीही राजकीय चिखलफेक झाली, तरीपण आम्ही उत्तर देणार नाही. विकासाचे व्हिजन घेवून आमची वाटचाल सुरू आहे. आम्हाला विकासाचा ब्रँड घेवून जनतेसमोर जायचे आहे. मात्र विरोधकांना दुसऱ्याला बाद करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले आहे. शंभर वर्षांचा वारसा सांगत असताना आपण जनतेसाठी काय केले हेही सांगणे महत्वाचे आहे. विकासकामांची आम्हाला आस आहे. देशाच्या प्रगतीसाठी निवडून द्यावे. आपल्या मतदानाच्या उपकाराची परतफेड निश्चित करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गोकुळचे संचालक युवराज पाटील म्हणाले, कागल तालुक्यात विकासाची गंगा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून आली आहे. कोणतेही विकासकाम शिल्लक राहिले नाही. येत्या निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक यांनी मताधिक्य देवू, अशी ग्वाही दिली.

विजय काळे यांनी संसदेच्या प्रांगणात राजर्षी शाहू महाराजांच पुतळा उभारणे, कोल्हापूर रेल्वे स्टेशनचे नामकरण यासह अन्य कामातून स्व. मंडलिक यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा जपला आहे. त्यांच्याप्रमाणे काम करणा-या संजय मंडलिक यांना विजयी करा, असे आवाहन केले.

भैय्या माने, सुधीर पाटोळे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी सरपंच रणजित कांबळे, माजी उपसरपंच अजित शेटे, विकास पाटील, प्रकाश गाडेकर, अतुल जोशी, कैलास जाधव, सुधाकर खोत, प्रकाश पाटील, नितीन दिंडे, अमर कांबळे, बाळासो लोखंडे, विशाल शेटे, संजय हेगडे, कृष्णात पाटील आदीसह ग्रामस्थ, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

स्वागत राजेंद्र माने यांनी केले. किरण पास्ते प्रास्ताविक केले. अमर कांबळे यांनी आभार मानले.

विकासाचा ब्रँड…
खासदार मंडलिक यांना उद्देशून सरपंच ॲड. सौ. वीरश्री जाधव म्हणाल्या, विविध धोरणांचा अभ्यास करून देशाशी निगडित विषयांशी खासदारांनी काम करायचे असते. आपल्या कामाचे ब्रॅण्डिंग करणे या युगात महत्त्वाचे असते. तुम्ही कामे केलात, पण ब्रँडींग केला नाही. त्यावर संजय मंडलिक म्हणाले, विकासाचा ब्रँड घेवूनच आपण चाललो आहोत. मात्र विरोधकांना दुसऱ्याला बाद करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले आहे. नेमक काम करणारा उमेदवार कोण हे जनतेनेच ठरवायचे आहे.

विरोधकांच्या बुद्धीची कीव येते..
चंदगड येथील सभेत मताधिक्य देणाऱ्या तालुक्याला ज्यादाचा निधी देण्याचा मी केलेल्या घोषणेवरून विरोधी पक्षातील काही बुद्धिजीवी, महागुरू आणि उच्चशिक्षित नेत्यांनी माझ्या विरोधात तक्रार दाखल केल्याचे बोलले आहेत. त्याला उत्तर देताना विकासकामांना निधी देणे म्हणजे प्रलोभन देणे आहे का? अशी विचारणा करत विरोधी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या प्रलोभानांचा उल्लेख केला. तक्रार करा आम्ही सक्षम आहोत असा इशाराही त्यांनी दिला.
………………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *