बोळावी / प्रतिनिधी
स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांनी शेतकरी कल्याणाच्या मोठ्या उदात्त भावनेतून शाहू दूध संघाची स्थापना केली होती. समरजीत घाटगे, तुम्ही तो विकून, मोडून खाल्लात. शाहू दूध संघ सावरायच्या नावाखाली शाहू कारखानाही बुडविलात. पंजाब सिंध कंपनीला विकलेल्या शाहू दूध संघाच्या नावावर केंद्र सरकारचे ३२ कोटी अनुदानही लाटलेत. तुम्ही भ्रष्टाचाराने स्वतःच्या तुंबड्या भरल्या. या सगळ्याचा हिशेब जनतेला द्या, असे आव्हान युवा कार्यकर्ते विजय काळे यांनी केले.
बोळावी ता. कागल येथे जाहीर सभेत श्री. काळे बोलत होते.
भाषणात विजय काळे पुढे म्हणाले, समरजीत घाटगे यांनी शाहू दूध संघ पंजाब सिंध या खाजगी कंपनीला विकला की नाही, ते आधी स्पष्ट करावे. विकलेल्या दूध संघाचे संकलन दररोज पाच हजार लिटर असताना ते ५० हजार लिटर दाखवून राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून त्यांनी ३२ कोटींचे अनुदान लाटले. त्यानंतर दूध संघाशी चौकशी झाल्यावर माफीनामा लिहून देऊन ते प्रकरण मिटवलात. दूध संघाला हातभार लावण्यासाठी शाहू साखर कारखान्याकडून आलेल्या पाच कोटींचे तुम्ही काय केले? शाहू दूध संघ त्या पाच कोटी ठेवीचे ८० लाख व्याज साखर कारखान्याला देणे लागतो. परंतु; ठेवीची मुद्दलही गेली आणि व्याजही गेले, अशी वाईट परिस्थिती आहे. त्यांचे स्वीय सहाय्यक सुरेश फासके यांच्या राजे बँकेच्या खात्यावरून शाहू दूध संघाला २५ लाख रुपये जमा झाले. लाडक्या पी. ए. कडे एवढी रक्कम कशी काय? त्यानंतरही शाहू दूध संघाला शाहू साखर कारखान्याकडून ६४ लाख रुपये आलेले आहेत. ते पण परत केले नाहीत. डिसेंबर २०२२मध्ये दूध बिलापोटी देण्यासाठी ८० लाख नव्हते. परंतु; राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान मिळवण्यासाठी २६ डिसेंबर २०२२ रोजी दूध संघाच्या राजे बँकेतील खात्यावर एक कोटी आले कोठून?
जनतेच्या दरबारात हिशोब द्या…….
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, समरजीत घाटगे यांचे जे विषय बाहेर येत आहेत ते फार गंभीर आहेत. त्याबद्दल ते एक शब्दही बोलायला तयार नाहीत. याचा हिशेब त्यांना जनतेच्या दरबारात द्यावाच लागेल.
*२५० कोटींचे विस्तारीकरण?
श्री काळे म्हणाले, समरजीत घाटगे यांनी शाहू साखर कारखान्याच्या विस्तारणीकरणाचा खर्च २५० कोटी कर्जातून केल्याचे सांगितले. परंतु; त्यातील दूध संघासाठी किती दिले, हे सुद्धा सांगितलेच पाहिजे.
शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील म्हणाले, बोळावीसारख्या डोंगर कपारीत वसलेल्या आणि अठरा विश्व दारिद्र्यात असलेल्या बोळावी, ठाणेवाडी आणि बोळावीवाडी या खेड्यांचा सर्वांगीण विकास मंत्री मुश्रीफ यांनी केल्यामुळे या सर्वच खेड्यांचा चेहरा मोहरा बदलला आहे.
संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष धनराज घाटगे-वंदुरकर म्हणाले, समरजीत घाटगे यांच्या नेतृत्वाखाली बंद पडलेल्या शाहू दूध संघाचे प्रत्येकी दोन शेअर्स शाहू कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना सक्तीने घेणे भाग पाडले. मात्र त्या संघाचा कोणताही लाभ त्यांना दिला गेला नाही ही खंत वाटते.
महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा शितल फराकटे म्हणाल्या, एका बाजूला विकासाचा डोंगर उभा करणारे आमचे नेते मंत्री हसन मुश्रीफ कुठे… आणि या विकासाला रोखण्याची भूमिका घेणारे समरजीत घाटगे कुठे…याची तुलना मतदारांनी करणे आवश्यक आहे.
बोळावी येथे स्वागत व प्रास्ताविक भैरवनाथ खांडेकर यांनी केले. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत, विजय काळे, विलास कांबळे, दयानंद कणसे, हरी डवरी यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर मारुती पाटील, वास्कर मामा, आनंदा पाटील, विलास पाटील आदी उपस्थित होते. मनीषा पाटील यांनी आभार मानले. मासा बेलेवाडी येथे आयोजित बैठकीत शहाजी पाटील, सरपंच सौ. राजश्री पाटील, उपसरपंच सोनाली गोरुले, श्रीपती शिंत्रे, नामदेव पाटील, मुकुंद घोडके, बबन शिंत्रे, साताप्पा कांबळे, सदाशिव पाटील, पांडुरंग गोरे यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
………………