सोनाळी / प्रतिनिधी
सोनाळी ता. कागल येथील शेतीच्या पाण्यासाठी श्री. नागनाथ पाणीपुरवठा संस्था उभारणीला भूविकास बँक आणि केडीसीसी बँकेचे कर्ज दिले होते. अडीअडचणीमुळे ही संस्था थकीत जाऊन बंद पडली. त्यानंतर आधी भूविकास बँकेने कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने कर्जमाफी करून शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमुक्त करू, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
सोनाळी ता. कागल येथे आयोजित प्रचारसभेच्या अध्यक्षस्थानी रामभाऊ शेणवी होते.
माजी खासदार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, मतदारसंघातील प्रत्येक कामाला मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांचा हात लागला आहे. विकासकामांच्या माध्यमातून तालुक्याचा कायापालट झाला आहे. विकासाच्या माध्यमातून त्यांनी आदर्श वस्तूपाठच घालून दिला आहे. विकासाचा रथ गतीने आणखीन पुढे जाण्यासाठी मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांना त्यांनी केलेले कामाला साजेशा प्रचंड मताधिक्याने निवडून देवूया. राज्यामध्ये युतीचे सरकार असल्यामुळे मुश्रीफसाहेब यांना अनेक खात्याचे मंत्रीपद मिळाले. अनेक चांगल्या लोककल्याणकारी निर्णयासह त्यांनी मंत्रिपदाला न्याय दिला. त्यामुळे कागल तालुक्यामध्ये प्रचंड मोठा निधी आला आहे. सामान्यातील सामान्य माणसांना त्यांनी ताकद दिली आहे. त्यामुळे गट-तट, हेवेदावे विसरून कामाला लागावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
पंचायत समितीचे माजी उपसभापती भूषण पाटील म्हणाले, आज विरोधक कोणत्या मुद्द्यावर मतं मागायला येतात ? हेच समजत नाही. एकही काम केलेले नाही. मात्र; केलेल्या कामाच्या चुका काढत ते आज टीका करीत आहेत. त्यांना लोकांनी खड्यासारखं बाजूला करावे.
समरजीत घाटगे वापरा आणि फेका प्रवृत्तीचे……!
भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले, समरजीत घाटगे हे प्रचंड स्वार्थी, मतलबी आणि वापरा आणि फेका असे नीच वृत्तीचे आहेत. भारतीय जनता पार्टीचा वापर त्यांनी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि फायद्यासाठीच करून घेतला. पक्षाने त्यांना भरपूर दिले. परंतु; ज्यावेळी पक्ष संघटनेला काही देण्याची वेळ आली त्यावेळी मात्र ते लाचार होऊन पळून गेले. मतदारसंघात जो काही निधी आलेला आहे तो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेला आहे. हा निधी समरजीत घाटगेनी आणलेलं नाही, त्यांचा या निधीशी काहीही संबंध नाही.
मुश्रीफसाहेब, संपूर्ण गाव एकमुखाने तुमच्या पाठीशी….
माजी खासदार प्रा. संजयदादा मंडलिक म्हणाले, येथील नागनाथ पाणीपुरवठा संस्थेच्या रूपाने संपूर्ण गावातील शेतकरी कर्जाच्या गाळात रुतलेला आहे. मुश्रीफसाहेब, काहीही करा आणि हे गाव शंभर टक्के कर्जमुक्त करा. संपूर्ण गाव तुमच्या पाठीशी एकमुखाने उभा आहे.
यावेळी अंबरीशसिंह घाटगे, पी. व्ही. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
समाधान म्हातुगडे, रमेश कोरे, बसू कोरे, सतीश भिऊगडे यांनी मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांना पाठिंबा दिला. यावेळी बिद्रीच्या माजी संचालिका सौ. कमल चौगुले, मंडलिक साखर कारखान्याचे संचालक एन. एस. चौगले, रणजीत शेणवी, सिताराम लोंढे, उमाजी पाटील, आनंदराव भिउंगडे, सागर चौगुले, माजी सरपंच अशोक चौगुले, अनिल पाटील आदी उपस्थित होते.
………….