सिद्धनेर्ली. / प्रतिनिधी
शक्तिपीठ महामार्गाच्या रूपाने शेतकऱ्यांवर भूमीहीन होण्याचे संकट ओढवले होते. शेतकऱ्यांमधील उद्रेक आणि संतप्त भावना लक्षात घेऊन सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करून कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग रद्दची अधिसूचना काढून घेतली. ही अधिसूचना खोटी आणि फसवी असल्याचा अपप्रचार समरजीत घाटगे करीत आहेत. त्यांनी ती अधिसूचना खोटी असल्याचे सिद्ध केल्यास अजूनही निवडणुकीतून माघार घेतो, असे आव्हान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
सिध्दनेर्ली ता. कागल येथील जाहीर प्रचार सभेत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सातव्यांदा निवडणूक लढवत आहोत. डबल हॅट्रिक करण्याची संधी मला द्यावी, असे आवाहन करून ते म्हणाले, विकासाचे प्रचंड काम करून दाखविले आहे. त्यामुळे आपण प्रचंड मतांनी निवडून येणार आहे. राज्यात आमचे सरकार स्थापन होणार असून चांगले काम करण्याची पुन्हा आपल्याला संधी मिळणार आहे. लोकहिताच्या व जनकल्याणाच्या दृष्टीने चांगले निर्णय घेण्याची शक्ती जागृत देवस्थान श्री. सिद्धेश्वरांने द्यावी, असेही ते म्हणाले.
मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाता?
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सिद्धनेर्लीत समरजित घाटगे यांच्या नेतृत्वाखाली श्रीमंत जयसिंगराव घाटगे पतसंस्था ही त्यांच्या आजोबांच्या नावाची संस्था आहे. संस्थेचे मॅनेजर तानाजी जालिंदर पाटील यांचे दहा महिन्यापूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या सह्या नसलेली त्यांच्या नावाची कर्ज प्रकरणे दाखवून मृत्यूनंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून एक कोटी, ८५ लाखांची वसुली लावली आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब या तणावाखाली चिंताग्रस्त आहे. ही चौकशी त्यांच्या मृत्यूनंतरच का लागली? सतत ऑडिट वर्ग असणारी संस्था आणि दोन वेळा बँको पुरस्कार मिळालेला मॅनेजर भ्रष्टाचारी कसा असू शकतो? मी त्या अन्यायग्रस्त कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभा आहे. निवडणूक होताच या प्रकरणात हात असलेल्या समरजीत घाटगे यांच्या म्होरक्यांचा पर्दाफाश करणार असून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करणार.
हिम्मत असेल तर यावर बोला….!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सिद्धनेर्लीतील दलित समाजाला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी साडेपाच एकर जमीन कसून खाण्यासाठी दिली होती. त्यामध्ये हा समाज संरक्षित कुळ होता. श्रीमंत बापूसाहेब महाराज, श्रीमंत बाळ महाराज, श्रीमंत विक्रमसिंहराजे घाटगे या सगळ्यांच्याच नावावर ही जमीन त्या -त्या कालखंडात होती. त्यांनी कधीही या संरक्षित कुळाला त्रास दिला नाही. परंतु; जमीन वारसा हक्काने समरजीत घाटगे यांच्या नावावर होताच ही जमीन का काढून घेतली?
यावेळी शुभांगी पाटील, सायली आगळे, भाजप तालुकाध्यक्ष एकनाथ पाटील, गोकुळचे संचालक अंबरीशसिंह घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत दादासो पाटील यांनी केले. एम. बी. पाटील, व्ही. जी. पवार, राहुल महाडिक, विनायक आगळे, सरपंच दत्तात्रय पाटील, कृष्णात मेटील, माजी सभापती सौ. पूनम मगदूम-महाडिक, माजी सरपंच सुरेखा पाटील, मनोहर लोहार, संदीप पाटील, रामजी घराळ, कबीर कांबळे, उपसरपंच वनिता घराळ, कल्याणी कुरणे आदी मान्यवर उपस्थित होते.
…………