December 22, 2024

खडकेवाडा, कौलगे, हळदी, चिमगाव, शिंदेवाडी व कुरुकली येथे संपर्क बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद

(कुरुकली / प्रतिनिधी)

विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मंत्री हसन मुश्रीफ यांचा विजय निश्चित असून आपण सर्व स्वाभिमानी मंडलिक गटाचे कार्यकर्ते या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार होऊया, असे आवाहन हमिदवाडा कारखाना संचालक, मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र युवा सेना पक्षनिरीक्षक ॲड. वीरेंद्रसिंह मंडलिक यांनी केले.

हळदी, ता. कागल येथे अर्जुनवाडा, हळदवडे, करंजिवने व दौलतवाडी तसेच कुरुकली येथे सुरूपली व सोनगे, खडकेवाडा येथे गलगले, अर्जुनी, लिंगनूर, मेतके तसेच कौलगे येथे नानीबाई चिखली व हमिदवाडा, चिमगाव येथे अवचितवाडी, ठाणेवाडी, बोळावीवाडी, बोळावी तसेच शिंदेवाडी येथे यमगे येथील मंडलिक प्रेमी कार्यकर्त्यांच्या संपर्क बैठकीत ते बोलत होते.

युवा नेते ॲड. वीरेंद्रसिंह मंडलिक पुढे म्हणाले, कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील गावांमधील वाड्या-वस्त्यांवर केलेल्या प्रचंड विकासकामांच्या जोरावर मंत्री हसन मुश्रीफ एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजय होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी व माजी खासदार संजय दादा मंडलिक त्यांचा आदेश प्रमाण मानून मंत्री मुश्रीफ यांच्या विजयासाठी सर्वांनी एकदिलाने काम करूया.केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, कोल्हापूर जिल्हा ही राजर्षी शाहू महाराज आणि दिवंगत लोकनेते खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या पुरोगामी विचारांची भूमी आहे. त्यांचा हा पुरोगामित्वाचा वारसा पालकमंत्री हसन मुश्रीफ व माजी खासदार प्रा. संजयदादा मंडलिक समर्थपणे पुढे चालवीत आहेत. मुरगुड व हमिदवाडा परिसरातील जनतेने संघर्षातून लोकनेते मंडलिक यांची पाठराखण केली असून या निवडणुकीत मंत्री मुश्रीफ यांना निश्चितपणे साथ देतील.

हमिदवाडा कारखान्याचे संचालक विश्वास कुराडे म्हणाले, लोकनेते कै. सदाशिवराव मंडलिक साहेबांचे येथील जनतेवर अनंत उपकार आहेत. त्यांनी या मतदारसंघाच्या विकासाचा यशस्वी पाया रचला. त्यांच्याच पाऊलवाटेवरून वाटचाल करीत मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजय दादा मंडलिक यांनी विकास मंदिरावर कळस चढवण्याचे काम केले आहे.

मंडलिक कारखान्याचे संचालक संभाजी मोरे, माजी संचालक शहाजी यादव, ज्येष्ठ नेते आर. डी. पाटील, मारूतीराव काळुगडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विकास पाटील -कुरूकलीकर, तुकाराम ढोले, दत्तात्रय मोहिते, अॅड. जीवनराव शिंदे, रवी ढेरे, बेनिक्रेचे माजी सरपंच सखाराम जाधव, पी बी अंगज, तानाजी एक्कल, बाजीराव अंगज, दत्ता लोंढे, सागर अंगज, ठाणेवाडी सरपंच मारुती गोते, अजित पाटील, आप्पा कोलेकर, सदाशिव गिरीबुवा, जयवंत पाटील, आप्पासो बेलवळेकर, जयवंत साळोखे, इंद्रजीत कडाकणे, महेश पाटील, डी एल कुंभार आदी प्रमुखांसह मंडलिक गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय पाटील यांनी आभार मानले…………………

गैरसमज व अफवांना बळी पडू नका….

ॲड. वीरेंद्रसिंह मंडलिक म्हणाले, विरोधकांकडे प्रचाराचा कोणताही मुद्दा नसल्यामुळे केवळ निरर्थक अफवा आणि मतदारांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रचार सुरू आहे. मंडलिक गटाने नेहमीच प्रामाणिकपणाचे तत्त्व जपले आणि जोपासले असून “पोटात एक आणी ओठावर एक” हि आमची वृत्ती कधीच नसते. एकदा निर्णय त्यानंतर आम्ही मागे हटत नाही.

गटतट व जाती-पातीच्या पलीकड….

प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, राजेशाही संपून अनेक वर्षे झाली. काहींना अजूनही राजघराण्याच्या वारशामुळे लोकप्रियता मिळेल, असे वाटते. मात्र मंत्री मुश्रीफ यांनी गटा-तटाची आणि जाती-पातीची सगळी बंधने तोडून गोरगरीब लोकांसाठी आयुष्य खर्ची घातले आहे. या दोन वृत्तींमधला फरक ओळखून आपण सर्वजण मंत्री मुश्रीफ यांची पाठराखण करणे ही काळाची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *