सावर्डे बुद्रुक येथे मंत्री मुश्रीफ यांच्या सभेत घणाघात
(सावर्डे बुद्रुक / प्रतिनिधी)
आपला पूर्वीचा गट एकच असून आपली नाळ एकच आहे, असा कांगावा करीत काहीजण आमच्या लोकांना गावोगावी भेटत आहेत. परंतु; गेली २५ वर्षे ज्यांनी केवळ द्वेषापोटी विश्वासघाताने आमची वाट लावली त्यांची वाट लावल्याशिवाय आता सोडायचं नाही, असा घणाघात माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केला. अशा फसव्या भावनिक कथा सांगत येणाऱ्या सोंगाड्यांना बळी पडू नका. त्यांना ठणकावून सांगून परतून लावा, असेही ते म्हणाले.
सावर्डे बुद्रुक ता. कागल येथे मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या जाहीर प्रचार सभेत बोलताना समरजीत घाटगे यांचे नाव न घेता माजी आमदार श्री. संजयबाबा घाटगे यांनी हा प्रहार केला.
माजी आमदार श्री. घाटगे पुढे म्हणाले, ‘मंत्री हसनसाहेब मुश्रीफ सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून गेली ३०-३५ वर्षे काम करीत आहेत. त्यांना प्रचंड मतांनी विजयी करणे ही काळाची गरज आहे. गेली २५ वर्ष आपण त्यांच्याशी संघर्ष केला. मात्र; आपण वैयक्तिक पातळीवर त्यांच्या खाजगी आयुष्यात कधीही डोकावलो नाही. त्यांनीही कधीच आमच्यावर वैयक्तिक पातळीवर येऊन निंदानादस्ती केली नाही. जेव्हा गरज होती, त्यावेळी त्यांनी पाठच्या भावापेक्षाही अधिक सहकार्य केले. म्हणूनच या निवडणुकीत आम्ही त्यांच्याबरोबर आहोत.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आपण नेहमी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करत आलो आहे. केलेली विकासकामे आणि जनसंपर्काच्या जोरावर जनतेने मला कायमच पाठबळ दिले आहे. या निवडणुकीतही आपण मोठ्या फरकाने विजयी होणार आहे. याचे शल्य विरोधी उमेदवाराला आहे. म्हणूनच विरोधी उमेदवार केवळ कुरघोड्या करत जनतेचा बुद्धिभेद करत आहे. विरोधकांचे काम तर काहीच नाही, मात्र केलेल्या कामाच्या चुका काढत मते मागत आहेत. जनता त्यांना कधीही थारा देणार नाही.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भूषणदादा पाटील, मीनाक्षी पाटोळे, विजय काळे यांनी मनोगत व्यक्त केले.
सरपंच मालुबाई शिंदे, पी. डी. हिरुगडे, पांडुरंग काशीद, डॉ. इंद्रजीत पाटील, सागर सावर्डेकर आदी उपस्थित होते.
आता का पोटात दुखतय…?
माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, जिथे शेतकऱ्याची हित आणि कल्याण आहे तिथे मंत्री श्री मुश्री यांनी आम्हाला सदैव पाठबळ दिले. अन्नपूर्णा साखर कारखाना हा केवळ मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्यामुळेच झाला, हे आम्ही जाहीरपणे सांगितल्यानंतर विरोधकांच्या पोटात दुखायला लागले आहे, असा टोला विरोधी उमेदवाराचे नाव न घेता लगावला…