December 22, 2024

करनूर / प्रतिनिधी


समरजीत घाटगे म्हणजे कुटील, खुनशी, कटकारस्थानी प्रवृत्ती. खोट्या कारवाया पाठीमागे लावून त्यांनी पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अनन्वित छळ केला. या सगळ्या षडयंत्राच्या मास्टरमाईंडचा येत्या निवडणुकीत बंदोबस्त करा, असे आवाहन आमदार अमोल मिटकरी यांनी केले.

करनूर ता. कागल येथे पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट सभेत ते बोलत होते.

आमदार अमोल मिटकरी म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ हे जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करतात. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी पाठबळ दिले आणि आज त्यांच्यावर जाती-पातीचा आरोप करणाऱ्या उमेदवारांना खड्यासारखं बाजूला करा. थोर महापुरुषांना रक्ताचे वारसदार नसतात, त्यांना विचारांचे वारसदार असतात. मंत्री श्री. मुश्रीफ हे महापुरुषांच्या विचाराचे वारसदार आहेत. अहो, हे राजे ना कमळाचे झाले, ना तुतारीचे… ते फक्त फितुरीचेच होतील..! असाही त्यांचा खरपूस समाचार घेतला. श्री. मुश्रीफ निवडून येणारच आहेत आणि त्यांना गृहमंत्रीपदही मिळणार आहे. कारण; ज्यांनी त्रास दिला, त्यांचा हिशोब चुकता करायचा आहे.

श्री. मुश्रीफ म्हणाले, विरोधी उमेदवार आम्ही विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर न देता बिळात जाऊन बसले आहेत. गेल्या पाच वर्षात मतदारसंघात सात हजार कोटी रुपयांचा निधी आणला आणि त्याचे पुस्तकरूपाने प्रत्येक घराघरात नव्हे तर विरोधकांच्या हातातही हे पुस्तक धाडसाने दिले आहे. हे करायलासुद्धा हिम्मत लागते, त्यातील एकही काम बिना मंजुरीचे असेल तर आपण आजही या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास तयार आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील, विजय काळे, बाळासो पाटील, मधुकर पाटील, दत्ताजीराव देसाई, यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत माजी उपसरपंच प्रवीण कांबळे यांनी केले. कार्यक्रमास सरपंच सौ. मंजिरी पाटील, उपसरपंच तानाजी भोसले, तातोबा चव्हाण, इम्रान नायकवडी, संभाजी पाटील, तानाजी कुंभार, के. डी. पाटील, बाबुराव धनगर, मोहम्मद शेख, बी. जी. पाटील यांच्यासह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


घामाच्या पैशावर विरोधकांच्या उड्या…
माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी विरोधी उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांचे नाव न घेता जोरदार आरोप केले, माझ्या कारखान्यातील एकही कर्मचारी घरातील कामासाठी घेतला नाही. कारखान्याची गाडी घेतली नाही. विरोधी उमेदवार कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना घरातील कामासाठी लावतात. गाड्या तर बेहिशोबी वापरतात. आमचा शेतकरी घामाने पिकवलेला ऊस कारखान्याला घालतो आणि त्यांच्या जीवावर विरोधी उमेदवार उड्या मारत आहेत.


लाय डिटेक्टर मशीनही फुटेल….! अंबरीशसिंह घाटगे म्हणाले, समरजीतसिंह घाटगे हे सभेतून इतके खोटे बोलत आहेत, की त्यांची लायडिटेक्टर चाचणी केली, तर ते मशीनही फुटेल. असा घणाघात करताच टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी दाद दिली.

करनुर ता. कागल येथील जाहीर प्रचार सभेत बोलताना पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ, आमदार अमोल मिटकरी व उपस्थित ग्रामस्थ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *