December 22, 2024

उत्तूर / प्रतिनिधी

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणजे माणसातला देवमाणूस. त्यांचे काम गट-तट आणि पक्ष- पार्टीच्या पलीकडे आहे. त्यामुळेच त्यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष उमेदवाराला या निवडणुकीत पाठबळ दिले, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांनी केले.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ उत्तूर ता. आजरा येथे श्री. आपटे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे होते.

श्री. आपटे म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यातून पूर्णत्वाला गेलेला आंबेहळ प्रकल्प हे या विभागाच्या शेतकऱ्यांचे स्वप्न होते. प्रकल्पाच्या उत्तरेकडील भागातील धामणेपासून चव्हाणवाडी व पुढे अगदी धामणे पठारापर्यंतच्या खोऱ्यामध्ये शेतीच्या पाण्यासाठी उपसा जलसिंचन योजना निर्माण व्हावी आणि हे काम मंत्री श्री. मुश्रीफच करू शकतात याचा आपल्याला विश्वास आहे.

जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे म्हणाले, पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी बहुतांशी विकासकामे पूर्ण केली आहेत. अजूनही ही विकासगंगा अखंडपणे वाहत राहील.

भेदभाव न मानता कामे केली….

श्री. आपटे म्हणाले, आजपर्यंत ज्या- ज्या वेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांच्याकडे सार्वजनिक कामे घेऊन गेलो. त्या त्यावेळी त्यांनी कधीही आपला- परका, गट- तट, पक्ष -पार्टी हा भेदभाव बाळगला नाही. आम्ही सांगेल त्या कामासाठी त्यांनी मनापासून मदत केली.

माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी समरजित घाटगे यांच्यावर कडाडून विरोध करीत ते कधी पंढरपूरला गेले नाहीत. पण रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असे म्हणत फिरत आहेत. ही तुतारी मोडूनच काढा असे आव्हान त्यांनी उपस्थितांना केले.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आंबेओहळ प्रकल्पावरून उमेश आपटे यांना अपेक्षित असलेल्या दोन्हीही उपसा जलसिंचन योजना सुरू करून हरित क्रांती होईल. मी मंजूर केलेल्या कोणतेही काम थांबणार नाही किंवा निधी परत जाणार नाही. तसेच; कागल मतदारसंघाच्या इथून पुढच्या विकासासाठीसुद्धा कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही दिली.

शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र गड्ड्यानवार म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचंड कामामुळेच आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना अखंडपणे चालू ठेवण्यासाठी फार मोठे योगदान देऊन मोठी मदत केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष झालेले डॉ. प्रकाश शहापूरकर यांनाही त्यांनी फार मोठी मदत केली. परंतु; ते ती मदत सोयीस्कररित्या विसरले. मंत्री श्री. मुश्रीफ यांनी कारखान्याला केलेल्या अर्थसाहाय्याचा हिशोबही डाॅ. शहापूरकर यांना द्यावाच लागेल..

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती शिरीष देसाई, विश्वनाथ करंबळी, मारुती घोरपडे, शिवलिंग सन्ने, डॉ. प्रकाश तौकरी, सरपंच किरण अमनगी, केडीसीसीचे संचालक सुधीर देसाई, दीपक देसाई, अतिशकुमार देसाई, मिलिंद कोळेकर, अभिनंदन परुळेकर, श्रीपती यादव, राजू खराटे, इत्यादी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार संजयबाबा घाटगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र गड्ड्यानवार, रिपाईचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे, मराठी अभिनेते सयाजी शिंदे, प्रा. मधुकर पाटील, विजय काळे या प्रमुखांची मनोगते झाली. स्वागत व प्रास्ताविक संभाजीराव तांबेकर यांनी केले. आभार गणपतराव सांगले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *