December 23, 2024

कागल / प्रतिनिधी

 हसन मुश्रीफ म्हणजे गोरगरिबांना सोबत घेऊन चालणारा प्रामाणिक आणि इमानदार नेता आहे, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफुल पटेल यांनी काढले. त्यांना विक्रमी व ऐतिहासिक मताधिक्याने निवडून द्या. राज्यात यापेक्षाही चांगली जबाबदारी मिळेल. हे नेतृत्व सांभाळणं, जोपासणे आणि अजूनही मोठं करणं ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

कागलमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला विराट गर्दी झाली.

भाषणात श्री. पटेल पुढे म्हणाले, गेल्या 30-35 वर्षात शरद पवारसाहेबांचा आम्ही सन्मानच केला. त्यांना कधीही एकसुद्धा उलट प्रश्न केला नाही. मी शरद पवारसाहेबांना नम्रपणे सांगू इच्छितो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श मानून श्री. मुश्रीफ वाटचाल करीत आले आहेत. त्यांना दुसरे कोणतेही लेबल लावू नका. त्यांनी केलेले प्रचंड काम आणि जनतेचा आशीर्वाद यामुळेच ते सलग पाचवेळा निवडून आले आहेत. आम्ही कधीही शिव-शाहूंच्या विचारांशी तडजोड केली नाही. त्या विचारांचे संरक्षण करण्याचाच सदैव प्रयत्न केला.
योजना मतदार संघांपर्यंत खेचून आणणारा हसन मुश्रीफ यांच्यासारखा जाणकार आणि अनुभवीच लोकप्रतिनिधी हवा, असेही ते म्हणाले.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले,
काहीही झाले तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अनुदान दरमहा दीड हजारांवरून सुरुवातीला रू. २१०० व नंतर तीन हजार रुपये करणारच. समरजीत घाटगे यांनी सिध्दनेर्लीतील दलित समाजाची जमीन काढून घेऊन त्यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप करून श्री. मुश्रीफ म्हणाले, माझे दलित समाजाला आवाहन आहे की समरजीत घाटगे यांना या निवडणुकीत जन्माची अद्दल घडवूया.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, समरजीत घाटगेनी बंद पाडलेल्या व विकून मोडून खालेल्या शाहू दूध संघाच्या नावावर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे ३२ कोटींचे अनुदान लाटले आहे. ही ईडीला फिट बसणारी केस आहे. निवडणूक होताच ही तक्रार ईडीकडे दाखल करू. मग बघूया समरजीत घाटगे पुढच्या दाराने पळतात, मागच्या दाराने पळतात की वरच्या दाराने पळतात?

श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. सात हजार कोटी निधी आणल्याचे विकासगंगा हे पुस्तक संपूर्ण मतदारसंघात घरोघरी दिले. माझे आव्हान आहे, त्यातले एक जरी काम प्रशासकीय मान्यता नसल्याचे विरोधकांनी सिद्ध केले तर या क्षणापासून निवडणुकीतून माघार घेतो. चार न्हवे ९०० बेरोजगार कंत्राटदारांना रोजगार दिल्याचा अभिमान वाटतो असे सांगतानाच ते म्हणाले यापैकी कोणाकडून चहासुद्धा पिल्याचे विरोधकांनी दाखवून द्यावे.

एक लाखाहून अधिक मताधिक्य
श्री. मुश्रीफ म्हणाले, कागलसह गडहिंग्लज, मुरगूड, उत्तुर, कसबा सांगाव, सेनापती कापशी येथील सभांना लोकगंगेला आलेला महापूर पाहता या निवडणुकीत मी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्यासारख्या दुसरा नेता नाही. म्हणूनच त्यांना आम्ही पाठिंबा दिला आहे.

गोकुळचे संचालक अंबरीशसिंह घाटगे म्हणाले, गेली २५ वर्षे कधी पाठीमागून तर कधी इकडून तिकडून वार करून आमचा विश्वासघात केला. तेच आता या निवडणुकीत समोर आहेत, त्यांचा असा पराभव करा की दारुण पराभव काय असतो? हे दाखवून द्या.

जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, कागलच्या वाड्यात तहसील कार्यालय होते ती जागा परत मिळावी म्हणून कोर्टात दावा दाखल करून परत घेणारे या तालुक्याचे नेतृत्वच होत नाही.

कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, ज्यांनी शाहू दूध संघ मोडून-विकून खाल्ला, शाहू साखर कारखान्यावर २५० कोटी रुपयांचे कर्ज केले. ते आम्हाला सहकार शिकवायला लागले आहेत. मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्यावर टीका करताना दहावेळा विचार करा, तुमच्या पत्नीने मलेशियाला पाठवलेल्या पाकिटामध्ये काय होते? ते एकदा जनतेला सांगा…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. बाळासाहेब पाटील, विजय काळे, संजय हेगडे, दत्ताजी देसाई, वैष्णवी चितारी, तानाजी कुरणे, प्रभाकर कांबळे, साक्षी जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.

माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, समरजीत घाटगे यांची अनेक सभेतील बालिशपणाची भाषणे ऐकून, मला आता असे वाटायला लागले आहे, की डबक्यातील बेडूक माशाला म्हणतो, तुला पोहता येते का? गांडूळ शेष नागाला विचारतो तुला फणा काढता येतो का? डोमकावळा गरुडाला विचारतो तुला झेप घेता येते का?

लबाड लांडगं ढाॅग करतय..!

आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे म्हणाले, जातीयतेचा आधार घेऊन अपप्रचार करण्यात विरोधी उमेदवार माहीर आहे. येत्या दोन दिवसांत अशा काही क्लुप्त्या करून काहीतरी ते ढोंग करणार…! अहो, दलितांना दिलेल्या जमिनी काढून घेतल्या. त्यांच्या अन्नात माती कालवली आहे. त्याला अद्दल घडवा.

माजी आमदार संजयबाबा घाटगे, गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबगोंडा पाटील, भाजपाचे भरत पाटील, शमशुद्दीन मुश्रीफ, अतुल जोशी, महेश घाटगे, संजय हेगडे, आदिल फरास, दत्ताजीराव देसाई, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पाटील
बाबसाहेब पाटील आसुर्लेकर, भूषण पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, प्रकाशराव गाडेकर, नितीन दिंडे, प्रविण काळबर, सुभाष करंजे, संजय चितारी, सुनिल माने, माजी नगराध्यक्षा संगिता गाडेकर, सौ. सायरा मुश्रीफ, सौ. सबीना मुश्रीफ, सौ. नबीला मुश्रीफ, सौ. अमरीन मुश्रीफ आदी प्रमुख उपस्थित होते.

लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना प्रफुल पटेल म्हणाले, या योजनेचे वित्तमंत्री अजितदादा पवार आहेत. त्यामुळे या योजनेला निधी कमी पडणार नाही.

श्री. मुश्रीफ म्हणाले, मला अनेक वर्षे साथ दिली. हे विसरू शकत नाही. आता उरलेले ६० तास द्या. मी तुम्हाला माझे पूर्ण आयुष्य देतो. विरोधकांचा विरोध नाही करायचा, शांत बसून कार्यक्रम करायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *