December 22, 2024

मुरगूड/ प्रतिनिधी


चिमगांव (ता. कागल) येथील रणजीत आंगज यांच्या दोन मुलांचा केकमधून विषबाधा झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. केकमधून विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झालेल्या या दोन सख्या बहिण- भावांच्या मृत्यूच्या घटनाक्रमामुळे आमदार श्री. मुश्रीफही गहिवरले. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या या आंगज कुटुंबियांचे आमदार हसन मुश्रीफ सांत्वन केले. डोंगराएवढ्या या दुःखातून सावरण्यासाठी धीर दिला. आज शुक्रवार दि. ६ सकाळी मुंबईवरून कागलमध्ये येताच आमदार श्री. मुश्रीफ यांनी तडक चिमगांव गाठले. या कुटुंबाला हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने अर्थसहाय्यही देण्यात आले. शासकीय पातळीवरही सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा करू, असेही त्यांनी सांगितले.

आमदार श्री. मुश्रीफ सकाळी साडेदहाच्या सुमाराला चिमगांव येथे आंगज कुटुंबीयांच्या घरी पोहोचताच त्या मृत्युमुखी पडलेल्या दोन्हीही चिमुकल्यांचे वडील रणजीत आंगज यांनी हंबरडा फोडला. पोटच्या दोन चिमुकल्यांच्या मृत्यूच्या आकांताने फोडलेल्या त्या बापाच्या आक्रोशाने आमदार श्री. मुश्रीफही पाच मिनिटे निशब्द झाले. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे प्रकृती चिंताजनक बनलेल्या व उपचारानंतर प्रकृती स्थीरावत असलेल्या मृत कु. श्रीयांश व कु. काव्या यांच्या आईच्या प्रकृतीचीही श्री. मुश्रीफ यांनी विचारपूस केली.

खचून जाऊ नका…..!

एकाचवेळी दोन्हीही चिमुकल्या मुलांच्या जाण्याने सैरभैर झालेल्या रणजीत आंगज यांनी आमदार श्री. मुश्रीफ यांना मिठी मारली आणि ओक्साबोक्शी रडताना म्हणाले, मुश्रीफसाहेब….. माझा पाच वर्षांचा श्रीयांश आणि आठ वर्षाची मुलगी काव्या गेली ओ……! त्यांना धीर देतच श्री. मुश्रीफ म्हणाले, तुम्हा कुटुंबियांवर कोसळलेला हा दुःखाचा डोंगरच शब्दांच्या पलीकडला आहे. खचून जाऊ नका. आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *