(कोल्हापूर / प्रतिनिधी )
बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज ) गावचे युवा सरपंच संतोष देशमुख यांची ८ डिसेंबर रोजी राजकीय गुंडांच्या आश्रयाखाली समाजकंटकानी अपहरण करून क्रूर व अमानुषपणे त्यांची हत्या केल्याप्रकरणी या हत्याकांड गुन्ह्याचा पोलीस अधीक्षक स्तरावर तपास होऊन सर्व संशयित गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी. या आशयाचे निवेदन कोल्हापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.
सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस राजाराम पोतनीस , प्रदेश कार्यकारणी सदस्य शिवाजी आप्पा मोरे , जिल्हाध्यक्ष इजी.जी एम पाटील ,जिल्हा समन्वयक ॲड. दयानंद पाटील , तालुका अध्यक्ष नेताजी पाटील, अभिजीत पाटील, आर जी पाटील ,कृष्णात बुरटे संदीप कांबळे संदीप चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवदेन देण्यात आले असून देशमुख कुटुंबाला न्याय द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा सरपंच परिषद महाराष्ट्र मुंबई यांचे कडून देण्यात आला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने माणुसकीला काळीमा फासला आहे. देशमुख हे लोकनियुक्त सरपंच होते. त्यांनी या गावचे सलग तीन वेळा सरपंचपद भुषविले आहे. देशमुख यांच्या प्रयत्नातून गावचा सर्वांगीण विकास होऊन या गावाला राज्यस्तर व जिल्हा स्तरावर अनेक पुरस्कार व पारितोषिक मिळाले आहेत. त्यांच्या सामाजिक कामामुळे केज तालुक्यात व बीड जिल्ह्यात सर्वत्र सुपरिचित, सन्मानित तसेच नावलौकिक होता. सरपंच देशमुख यांची हत्या बीड जिल्ह्यात फोपावलेल्या राजकीय गुंडगिरीतून झाली आहे. जनतेच्या कल्याणासाठी झगडणाऱ्या लोकप्रतिनिधींच्यावरती असे हल्ले होत असतील तर महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्देवी व चिंताजनक घटना आहे.
यावेळी समाधान म्हातुगडे , सौ. नलिनी कृष्णात सोनाळे, शारदा गुरव, मनोहर कांबळे, पंढरीनाथ भोपळे, सुरेश पाटील, भारती डेळेकर, तानाजी पवार , भगवान रोटे शिवाजी कांबळे, राजेंद्र कांबळे पी डी पाटील , विशाल तीराळे, अमोल पाटील, प्रकाश सावंत यासह जिल्ह्यातील आजी-माजी सरपंच ,उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.