
Beneficiaries warned against fake e-KYC websites in Ladki Bahin Yojana :
(विशेष वृत्त/ समाधान म्हातुगडे ) राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य केली आहे. ई-केवायसी करण्यासाठी सरकारकडून दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
यामुळे मोठ्या संख्येने महिला ऑनलाइन ईकेवायसी करत आहेत. पण त्याचवेळी अनेक खोट्या वेबसाइट्स तयार झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे बँक खाती रिकामी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.महिला व बालविकास मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात ईकेवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. राज्यातील २६ लाखांहून अधिक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं पुढे आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यात पुरुषांनीही महिलांच्या नावाने लाभ घेतल्याचं सांगितलं जातं आहे.
या योजनेसाठी पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनच ईकेवायसी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे. कारण लाडकी बहिणीच्या ई-केवायसीच्या नावावर अनेक खोट्या वेबसाईट तयार झाल्या आहेत. लाडकी बहीण योजनेची ईकेवायसी असं गुगलवर सर्च केल्यास, hubcomut.in नावाची वेबसाईट समोर येते आहे. या वेबसाईटवर माहिती भरल्यास तुमचं खासगी माहिती किंवा बँक खातं रिकामं होण्याची भीती आहे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अपात्र व्यक्तींना योजनेतून वगळण्यासाठी, योग्य लाभार्थी महिलांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी, सरकारी योजनांमध्ये पारदर्शिता राखण्यासाठी आणि भविष्यात डिजिटल सत्यापनाद्वारे इतर योजनांचा लाभ घेणे सोपे होण्यासाठी, ही ईकेवायसी महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारने जुलै 2024 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली.महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या मागचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत 21 ते 65 वयाच्या महिलांना प्रती महिना १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते आहे. हे पैसे थेट महिलांच्या खात्यात जमा होतात.



