
(विशेष वृत्तसेवा / समाधान म्हातुगडे )
राजकरणात उलथापालथ झाल्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघातील कागल , मुरगूड , गडहिंग्लज या तीन नगरपरिषद निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकनेते स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक व स्वर्गीय विश्वनाथराव पाटील यांच्या योगदानातून मुरगूडची जडणघडण झाली आहे. यावेळी मुरगुड नगरपरिषद निवडणुकीत खांदेपालट झाल्यामुळे चुरशीचा सामना पहायला मिळणार आहे. त्यासाठी शिवसेना – भाजप युतीने उद्या प्रचार शुभारंभाची जोरदार तयारी केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर व महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील या दिग्गज मंत्र्याच्या उपस्थितीत शिवसेना-भाजपा युतीचा मुरगुड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ उद्या सोमवार दिनांक २४ नोव्हे २०२५ रोजी सकाळी नऊ वाजता मुरगुड येथील अंबाबाई मंदिर समोर होत आहे.
यासाठी शिवसेनेचे माजी खासदार संजयदादा मंडलिक , माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील ,भाजपचे राज्याचे पदाधिकारी महेश जाधव, शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक वीरेंद्र मंडलिक ,जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील , दिग्विजय पाटील यांच्यासह शिवसेना व भाजपचे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिवसेना व भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते , महिला व युवक ,मतदार यांनी प्रचार शुभारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन युतीकडून करण्यात आले आहे.



