( मुरगूड / प्रतिनिधी: जोतीराम कुंभार )
मुरगूड येथील पत्रकार प्रकाश तिराळे ( कुरुकली ता – कागल ) यांना वृत्तपत्रात बातमी छापल्याच्या गैरसमजातून शिवीगाळ व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्ष , शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेखान कादरखान जमादार यांच्यासह दोघावर 128/ 2024 भादविसक, 323,504, 506,427,34, महाराष्ट्र प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था [हिसंक कृत्य व मालमत्तेचे नुकसान व हानी यांना प्रतिबंध) अधिनियम 2017 चे कलम 4 प्रमाणे मुरगूड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रकाश तिराळे हे दैनिक सकाळ या वृत्त पत्राचे बातमीदार म्हणून मुरगूड परिसरात काम करतात . दि. ९ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास गणपती मंदिर, मुरगूड येथील मेंडके बेकरीच्या समोरून प्रकाश तिराळे हे त्यांच्या कामानिमित्त जात होते . त्यावेळी राजेखान जमादार यांनी तिराळे यांना बघून काहीपण बातम्या छापता का असे मोठ्याने बोलले. त्यावेळी तिराळे यांनी तुमच्याविरुध्द कसलीही बातमी छापली नाही हे सांगत होते . त्यावेळी राजेखान जमादार यांनी तिराळे यांच्या कानसुलात लगावली.
यावेळी तिराळे हे जमादार यांना तुमची काही तक्रार असल्यास सपांदकांशी करा असे सांगत होते . तिराळे हे जमादार यांना संपादकांना फोन करण्याबाबत सांगत असताना त्यांनी संपादकांनाही शिवीगाळ केली. त्या दरम्यान जमादार यांनी आसिफखान उर्फ मॉन्टी आसदखान जमादार व संदिप अशोक सणगर यांना बोलावून घेतले. त्यानंतर जमादार यांनी आसिफखान उर्फ मॉन्टी जमादार व संदिप सणगर यांना तिराळे यास धरा रे याला, उचलून घेवून चला असे म्हणताच तिराळे यांचा हात पकडला . तसेच जमादार यांनी तिराळे यास शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच मॉन्टी जमादार व संदिप सणगर या दोघांनी तिराळे यास फरफटत नेले . त्यामुळे तिराळे यांच्या डाव्या हाताच्या करंगळीस लागले असून शर्टच्या खिशातील चष्मा फुटला आहे . याबाबत प्रकाश सखाराम तिराळे यांनी मुरगूड पोलिसात फिर्याद दिल्याने तिघा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे . अधिक तपास करवीरउप विभागीय पोलीस अधिकारी सुजीतकुमार क्षीरसागर करीत आहेत.
मुरगूड शहर पत्रकार संघातर्फे जाहीर निषेध
पत्रकार प्रकाश तिराळे यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी पत्रकार संघाची बैठक झाली. त्यामध्ये नगराध्यक्ष राजेखान जमादार यांचा अनेकांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला . यावेळी उपाध्यक्ष प्रवीण सुर्यवंशी , सचिव समीर कटके , सुनील डेळेकर , रविंद्र शिंदे , अनिल पाटील , अविनाश चौगले , जोतिराम कुंभार,संदीप सुर्यवंशी , शशीकांत दरेकर , दिलीप निकम ,राजू चव्हाण , , विजय मोरबाळे , ओंकार पोतदार , दिलीप सुतार उपस्थित होते .