(व्हनाळी/ प्रतिनिधी )
दैनिक सकाळमध्ये खरी, वस्तुनिष्ठ बातमी लावल्याच्या रागातून मुरगूड ता.कागल येथील राजेखान कादरखान जमादार – जिल्हा अध्यक्ष शिवसेना कोल्हापूर (श्री एकनाथ शिंदे गट ) (मुरगूड ता. कागल, जि. कोल्हापूर) यांनी दै.सकाळचे मुरगूड प्रतिनीधी श्री प्रकाश तिराळे (रा. कुरूकली) यांना मारहाण केली. गुरूवारी ता. ९ मे २०२४ रोजी सायंकाळी मुरगूड शहरात ही घटना घडली.
पत्रकारिता आणि लोहशाहीला मारक ही घटना असून पत्रकारांवर दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. या घटनेचा आचार्य बाळशास्त्री जांभेकर कागल तालुका पत्रकार संघटनेच्यावतीने आम्ही जाहिर निषेध करीत आहोत. प्रकाश तिराळे यांनी दिलेल्या बातमीत कोणाच्याही नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. घडलेल्या घटनेचे वॄत्तांकन करण्याचे काम पत्रकार प्रकाश तिराळे यांनी केले आहे. समाजात अनेक घटना घडत असतात त्याची माहिती संकलीत करून कार्यालयात पोहोचविण्याचे काम पत्रकार करत आले आहेत. त्यांना झालेली मारहाण म्हणजे पत्रकारिता आणि लोकशाहीवर केलेला हा हल्ला आहे. त्यामुळे राजेखान कादरखान जमादार व त्याला सहकार्य करणाऱ्या आसिफखान उर्फ मॉन्टी आसदखान जमादार, संदीप अशोक सणगर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत तातडीने कडक कारवाई करावी असा निर्णय यावेळी आयोजित बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर पत्रकार प्रकाश तिराळे यांच्या बरोबरच त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून त्यांना पोलीस संरक्षण मिळावे. अशा गुंडगिरी प्रवृत्तीच्या व्यक्तीचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा घेऊन पत्रकारांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी सर्व पत्रकारांनी केली.
या बैठकीला तालुका अध्यक्ष सागर लोहार,एन.एस.पाटील,रमेश पाटील,तानाजी पाटील,एकनाथ पाटील,प्रकाश कारंडे,संजय कांबळे,समाधान महातुगडे,जे.के.गोरंबेकर,राजू काशिद,कृष्णात शेटके, सुभाष चौगले,अशोक ससे,संदिप लोहार, उपस्थीत होते.