(व्हनाळी – सागर लोहार)
मुरगूड ता.कागल येथील वस्तुनिष्ठ बातमी दिल्याच्या रागातून दैनिक सकाळचे पत्रकार प्रकाश तिराळे (रा.कुरूकली) यांना मारहाण केल्याप्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे जिल्हाध्यक्ष आणि मुरगुड चे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि त्यांना तात्काळ अटक करावी आणि त्यांचे जिल्हाध्यक्ष पद काढून घ्यावे या मागणीचे निवेदन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने कागलचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांना देण्यात आले.
निवेदनातील मजकूर असा की, बातमीदार प्रकाश तिराळे यांनी घडलेल्या घटनेचे वृत्तांकन केले होते त्यांनी दिलेल्या बातमीत कोणाचेही नाव घातले नाही. असे असताना गुरूवारी ता. ९ मे २०२४ रोजी सायंकाळी राजे खान जमादार आणि त्यांच्या साथीदारांनी तिराळे यांना मारहाण केली आहे. पत्रकारिता आणि लोहशाहीला मारक ही घटना असून पत्रकारांवर दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. या घटनेचा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने आम्ही जाहिर निषेध करीत आहोत. समाजात अनेक घटना घडत असतात. त्याची माहिती संकलीत करून कार्यालयात पोहोचविण्याचे काम पत्रकार करत आले आहेत. त्यांना झालेली मारहाण म्हणजे पत्रकारिता आणि लोकशाहीवर केलेला हा हल्ला आहे. त्यामुळे राजेखान कादरखान जमादार व त्याला सहकार्य करणाऱ्या आसिफखान उर्फ मॉन्टी आसदखान जमादार, संदीप अशोक सणगर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत तातडीने कडक कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी. तिराळे यांच्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून त्यांना पोलीस संरक्षण मिळावे. असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी तालुका अध्यक्ष सागर लोहार, भास्कर चंदनशिवे, तानाजी पाटील, नंदकुमार कांबळे, बा.ल. वंदूरकर, जहांगीर शेख, कृष्णात माळी,नरेंद्र बोते, कृष्णात कोरे,कलंदर सनदी, विजय पाटील, विजय कुरणे, रवींद्र पाटील, इम्रान मकानदार, फारुख मुल्ला, शिवाजी पाटील, बाबासाहेब चिकोडे, नामदेव गुरव, प्रशांत दळवी, सम्राट सणगर,जय चौगुले आदी पत्रकार उपस्थित होते.