(कोल्हापूर /प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत एक मोठं वक्तव्य केलं. पुढच्या दोन वर्षात काही प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत जातील किंवा त्यातील काही पक्ष त्यांच्यासाठी चांगला पर्याय म्हणून काँग्रेस पक्षात विलीन होण्याबाबत विचार करतील, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.
त्यांच्या स्वत:चा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल का? असा प्रश्न शरद पवारांना विचारला असता त्यांनी आपल्या पक्षाच्या प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन याबाबत भाष्य करु, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं. पण शरद पवार यांच्या याबाबतच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत विविध चर्चांना उधाण आलंय.
शरद पवार यांच्या वक्तव्याबाबत त्यांचे नातू आमदार रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी रोहित पवारांनी भूमिका मांडली.“शरद पवार यांचा वेगळा आणि मोठा अनुभव आहे. त्यामुळे त्याबाबतीत जास्त स्पष्टपणे बोलू शकत नाही. मी ऐकलेले नाही आणि अभ्यासही केलेला नाही. त्यामुळे मी बोलू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.