( बिद्री /प्रतिनिधी ) :
उत्तरकार्याला पै पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळींना भांडी वाटप केले जाते. उत्तरकार्यादिवशी होणाऱ्या या अनाठायी खर्चाला पायबंद बसला पाहिजे, चुकीच्या प्रथा पडू नयेत यासाठी उत्तरकार्यादिवशी भांडी वाटपाला फाटा देत पर्यावरण संवर्धनाचा वसा घेत हापूस आंब्याची १५० रोपे भेट देण्याचा विधायक उपक्रम वाळवे खुर्द ( ता. कागल ) येथील संभाजी बिग्रेडचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या आईच्या उत्तरकार्यानिमित्त राबविला.
बाळासाहेब यांच्या आई सोनाबाई पाटील यांचे ४ मे ला निधन झाले. त्यांच्या रक्षाविसर्जन दिवशी प्रचलित प्रथांना फाटा देत रक्षा नदीत विसर्जित न करता शेतात टाकत त्यांनी जलप्रदुषण टाळले. त्यानंतर त्यांच्या उत्तरकार्याला आंब्याची रोपे वाटण्याचा निर्णय घेतला. त्याला घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनीही पाठिंबा दिला. बुधवारी ( ता. १५ ) रोजी त्यांचे उत्तरकार्य झाले. या वेळी आलेल्या नातेवाईक, पै-पाहुण्यांना व मित्रमंडळींना आंब्याची १५० रोपे भेट देण्यात आली.
याशिवाय गावच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला आणि स्मशानभूमीतही वड तसेच पिंपळाची रोपे लावण्याचाही निर्णयही पाटील यांनी घेतला आहे. यावेळी माजी सरपंच शिवराज पाटील, माजी उपसरपंच भरत पाटील, मुदाळचे उपसरपंच के. ए. पाटील, रंगराव पाटील, माजी सरपंच आरती बाळासाहेब पाटील, सागर पाटील, डॉ. एम. ए. पाटील, सर्जेराव सोनाळकर, दिलीप वाडकर, प्रमोद काळे, यशवंत शेणवी, सतीश माने यांच्यासह ग्रामस्थ व नातेवाईक उपस्थित होते.
” आईच्या आठवणी चिरंतन राहाव्यात यासाठी तिच्या उत्तरकार्याला भांडीवाटप न करता आम्ही आंब्याची रोपे वाटण्याचा निर्णय घेतला. पर्यावरण संवर्धनासाठीही वृक्षारोपण महत्त्वाचे असल्याने आम्ही राबविलेल्या या उपक्रमातून हातभार लागण्यास मदत होणार असून आईच्याही स्मृती जतन होणार आहेत. “-बाळासाहेब पाटील, विभागीय अध्यक्ष संभाजी बिग्रेड.