(गडहिंग्लज/प्रतिनिधी )
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षांकडे करियर म्हणून पहावे. यावेळी अपयश आले तरी खचून न जाता यश मिळेपर्यंत प्रयत्न करावेत. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. येथे स्वाती सुरेश बारामती हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेत पाटबंधारे (जलसंपदा विभाग) खात्यात सहायक अभियंतापदी निवडीबद्दल सत्कारवेळी ते बोलत होते.
श्री.घाटगे पुढे म्हणाले, पूर्वी स्पर्धा परीक्षांमध्ये शहरी भागातील विद्यार्थी यशस्वी होत असत. परंतु आता ग्रामीण भागातील विद्यार्थी अशा परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहेत. स्पर्धा परीक्षेत करिअर करू इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्वातीचे यश प्रेरणादायी आहे.
बारावीपर्यंतचे शिक्षण गडहिंग्लजमध्येच घेतलेल्या स्वातीने सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली येथे बी.टेक (स्थापत्य अभिांत्रिकी) ही पदवी प्रथम श्रेणीमध्ये पूर्ण केली. लहानपणापासून सरकारी नोकरीचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पदवीचे शिक्षण पूर्ण करत असताना तिने तयारी सुरू केली. त्याचा तिला फायदा झाला. तीन वेळा अपयश आले तरी खचून न जाता तिने जिद्द व चिकाटी व खडतर प्रयत्न करून मिळालेले यश आनंददायी असल्याचे तिने यावेळी सांगितले.
यावेळी स्वातीचे वडील माजी सैनिक व महसूल विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी सुरेश बारामती, विजयालक्ष्मी बारामती, शिवप्रसाद बारामती, शांताबाई कांबळे उपस्थित होते.