(विशेषवृत्त / समाधान म्हातुगडे)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कधी होणार याची मोठी उत्सुकता आहे. राजकीय पक्षांप्रमाणेच मतदारांच्याही मनात निवडणुकीच्या तारखांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या मंत्रालयामध्ये मोठी लगबग सुरू झाली आहे. विविध प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे, मतदारसंघातील कामांसंदर्भात आमदार फेऱ्या मारू लागले आहेत. खासगी कामांसाठीचे प्रस्ताव सादर करणे. अडलेल्या फाईल्स लवकर मार्गी लागाव्यात यासाठी प्रयत्न करणे ही कामे मंत्रालयात वेगाने सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकांची चाहूल लागल्याने ही सगळी गडबड सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
मंत्रालयातील कुजबुजीचा कानोसा घेतला असता महाराष्ट्रात आचारसंहिता कधी लागेल याबाबत ऐकू येवू लागले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेले सरकार २६ नोव्हेबरला अस्तित्वात आले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीनतरचे सरकारही २६ नोव्हेंबरच्या आत स्थापन होणे गरजेचे आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या एका भाषणात दिवाळीनंतर निवडणुका होतील असे म्हटले होते. ८ ते १० ऑक्टोबर दरम्यान आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये आचारसंहितेचा काळ एक महिन्याचा असतो. त्यामुळे ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल आणि त्यापुढे ३-४ दिवसांत मतमोजणी पार पडेल अशी शक्यता आहे.