December 23, 2024

  

बाचणीत आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमीपूजन

(बाचणी /प्रतिनिधी)

सन 2013 साली बाचणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळाली. मग अकरा वर्षात भूमिपूजन का झाले नाही? आम्ही भूमिपूजन चा जाहीर कार्यक्रम घेतला. तुम्हाला एका रात्रीत घाईगडबडीने पोलीस बंदोबस्तात भूमिपूजन का करावे लागले? हे केवळ श्रेयवादासाठी चालले आहे का? जनता सुज्ञ आहे.अत्यंत घाईगडबडीने केलेले भूमिपूजन हीच कागलच्या परिवर्तनाची नांदी आहे. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते,शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी पालक मंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला.
बाचणी(ता.कागल)येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सरपंच जयश्री पाटील होत्या.

आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी यशस्वीपणे पाठपुरावा केल्याबद्दल समरजितसिंह घाटगे यांच्यासह सरपंच जयश्री पाटील,उत्तम पाटील, यांचा नागरी सत्कार केला.

घाटगे पुढे म्हणाले,आरोग्य केंद्र मंजुरीचे सर्व श्रेय ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे आहे. आम्ही नाममात्र आहोत.
सन ,2013 साली या प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळाली. त्यावेळी माझा राजकीय जन्म झाला नव्हता असे नामदार मुश्रीफ साहेब बोलले. तुम्हीच तर सत्तेत आहात. मग गेली अकरा वर्षे या आरोग्य केंद्राचे काम का रखडले ? या परिसराला आरोग्य सेवांपासून आपण का वंचित ठेवले ? बाचणीसह परिसराच्या अत्यंत जिव्हाळ्याचे असलेले हे आरोग्य केंद्र होऊ नये म्हणून तुम्ही अनेक खटाटोप केले असे आम्ही ग्रामस्थांच्याकडून ऐकले. तरीही केवळ श्रेयवादासाठी त्यांचे तुम्ही भूमिपूजन करता यासारखे मोठे दुर्दैव नाही. असे सांगून ते म्हणाले, महिलांना जास्तीत जास्त आरोग्य सुविधा देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. ज्या शरद पवार साहेबांनी तुमची जात न पाहता तुम्हाला मोठे केले. त्यांच्यावर तुम्ही जातीय वादाचा आरोप करता हे वेदनादायी आहे. स्वर्गीय राजे विक्रम सिंहजी घाटगे आणि खासदार सदाशिवराव मंडलिक यांचीही तुम्ही अशीच अवहेलना केली होती हे जनता विसरलेली नाही.

प्रास्ताविकात माजी उपसरपंच उत्तम पाटील म्हणाले,आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या जागेच्या मंजुरीमध्ये पालक मंत्र्यानी सत्ता व पदाचा वापर करुन नेहमीच खोडा घातला.पण समरजितसिंह घाटगे यांचा पाठपुरावा व ग्रामपंचायतीचे प्रयत्न यामुळे या जागेस मंजुरी मिळाली.त्यामुळे घाई-घाईने उदघाटन करणा-या मंत्र्याना तो अधिकार नाही.तर ख-या अर्थाने तो समरजितसिंह घाटगे यांनाच आहे.

कार्यक्रमास शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, आर. के. पाटील, डी. एस. पाटील, रंगराव जाधव, संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्या आनंदी पाटील,अन्सार नायकवडी,सायर घोन्सालिस, सुमन पाटील, नफिसा शहाणेदिवाण, मेघा चौगले, ग्रामविकास अधिकारी सागर पार्टे आदी उपस्थित होते.

…. पोलीस बंदोबस्तात भूमिपूजन का?

मुश्रीफसाहेब काल म्हणाले,2013 साली हे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले. मग अकरा वर्ष भूमिपूजनला का लागली? आणि एका रात्रीत पोलीस बंदोबस्तात भूमिपूजनचा देखावा का ? राज्यभर गावाची बदनामी केली.चाळीस वर्ष राजकारणात असलेल्या मंत्र्यांना ,पालक मंत्री म्हणून शोभते का?

... यासाठीच माझा जन्म 

जन्मावरून केलेल्या टीकेला उत्तर देताना श्री घाटगे म्हणाले
आमदारकी आणि मंत्रीपदी असताना तुम्ही मतदारसंघात अनेक कामे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली आहेत. जनतेने तुम्हाला इतकी वर्षे सत्ता दिली. परंतु जनतेच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न व विकासकामे अद्याप रखडलीच आहेत. हे आरोग्य केंद्र त्याचाच भाग आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी, कागल विधानसभा मतदार संघाला नवी दिशा देण्यासाठीच माझा जन्म झाला आहे.

टिकेकडे लक्ष देऊ नका

  यापुढे माझ्यावर, माझ्या कुटुंबावर अनेक खालच्या पातळीवर टीका होतील. टीकेची दगडफेक होईल.त्यावर लक्ष देऊ नका. टीका करणे, दिशाभूल करणे, एवढेच त्यांच्याकडे काम शिल्लक आहे.  याच टीकेच्या दगडाच्या पायऱ्या करून विकासाचे व्हिजन ठेवून याच पायऱ्यावरून आपण वरती जाऊया.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *