विकास सेवा संस्थांचे शेतकरी सभासद, पगारदार, व्यावसायिकांसाठी योजना
संचालक मंडळ बैठकीत निर्णय: पाच व सात वर्षे मुदतीच्या योजना
(कोल्हापूर / समाधान म्हातुगडे)
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून शेतकरी सभासदांना आणि व्यक्तिगत कर्ज योजनेतून पगारदार नोकरदार व व्यावसायिकांना प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व बँकेचे अध्यक्ष नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महिनाभरापूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकरी सभासद, पगारदार नोकरदार व व्यावसायिकांसाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेसाठी कर्जसुविधा सुरू करावी, अशी मागणी सभासदांनी केली होती. त्यानुसार बँकेने १२ टक्के व्याजदराने या योजना अंमलात आणल्या आहेत.
केंद्र सरकारने देशातील नागरिकांना मोफत वीज पुरवठा करण्याकरीता प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना अमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत ३०० युनिट मोफत वीज मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी सभासदांना, नोकरदार पगारदारांना व व्यावसायिकांना प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेचा लाभ मिळण्याकरीता विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून व वैयक्तिक असा कर्ज पुरवठा केला जाणार आहे.
विकास सेवा संस्थांच्या सभासदांच्या योजनेमध्ये नवीन रूप-टॉप सोलर प्लांट खरेदीसाठी कर्जदार मागणीदार अ वर्ग सभासद असावा, तो थकबाकीदार नसावा. किंवा दहा गुंठे शेतजमीन असावी. कोटेशन रकमेच्या जास्तीत जास्त ८५ टक्के किंवा कर्ज परतफेडीच्या क्षमतेइतपत कर्ज दिले जाणार आहे. पगारदार नोकर व्यावसायिकांच्या व्यक्तिगत कर्ज योजनेमध्ये कर्ज मागणीदार कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असावा व बँकेचा खातेदार असावा. यामध्ये कोटेशनच्या १५ टक्के स्वगुंतवणूक आहे. या योजनेची कमाल कर्ज मर्यादा पाच लाख असून पगारदार नोकरांना कर्ज हप्त्याच्या ६५ टक्के कपाती इतपत कर्जमंजुरी होईल. व्यावसायिकांना गेल्या तीन वर्षाच्या उत्पन्नाच्या सरासरी ५० टक्के कर्जमंजुरी होईल.
या दोन्हीही योजनेत केंद्र सरकारच्या धोरणानुसार एक किलोवॅटसाठी रू. ३० हजारांचे अनुदान आहे. दोन किलोवॅटसाठी रू. ६० हजार तर तीन किलो वॅटसाठी रू. ७८ हजार अनुदान आहे. वार्षिक हप्त्याने पाच वर्षे व सात वर्षे मुदतीने कर्जवाटप होणार आहे.
यावेळी बँकेचे बँकेचे उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, माजी खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार संजयबाबा घाटगे, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे, आय. बी. मुन्शी आदी संचालक व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे उपस्थित होते.