कागलमध्ये शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक
(कागल /प्रतिनिधी )
प्रा संजय मंडलिक यांच्या प्रचंड मताधिक्याच्या विजयाची गुढी उभारूया, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांना खासदार करून स्वर्गीय खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांच्या ऋणातून मुक्त होण्याची हीच संधी आहे, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.
कागलमध्ये कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पालकमंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.
भाषणात पालकमंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे आपण जुने काहीतरी देणं लागतो, या भावनेतून शपथ घेऊया आणि विजयासाठी कामाला लागूया. त्यांनी गैबी बोगद्यातून कोल्हापूर शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी दिले आहे. तसेच; आम्हीही थेट पाईपलाईनच्या माध्यमातून कोल्हापूर शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी दिले आहे.
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, विरोधी बाजूकडून चुकीचा प्रचार केला जात आहे.
या तीन गोष्टी कटाक्षाने पाळा……..!
पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, या निवडणुकीत तीन गोष्टी कटाक्षाने पाळा. येत्या विधानसभेला तुम्ही काय करणार, असा प्रश्न प्रा. मंडलिक यांना विचारून त्यांची अडचण करू नका. आपण आजवर जनतेची सेवाच केलेली आहे. परमेश्वर आणि जनता आपल्या पाठीशी आहे. कोणतेही नकारात्मक मुद्दे उकरून काढून त्याची चर्चा करत बसू नका. तसेच; भाजपासह राष्ट्रवादी, शिवसेना- शिंदे गट आणि मित्रपक्ष मिळून एकदिलाने काम करूया. महायुतीतील घटक पक्षापैकी कोणीही नाराज होऊन त्याचा दुष्परिणाम प्रा. मंडलिक यांच्या मताधिक्यावर होईल, असे वर्तन आणि वक्तव्य करू नका.
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, कागलचे माजी नगराध्यक्ष नवल बोते, माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष नितीन दिंडे, कागल शहराध्यक्ष संजय चितारी, शशिकांत नाईक, शामराव पाटील, विजय काळे आदी प्रमुखांची भाषणे झाली.
व्यासपीठावर तात्यासाहेब पाटील, शामराव पाटील, प्रवीण काळबर, अतुल मटूरे, सतीश घाडगे, सागर गुरव, विवेक लोटे आदी प्रमुख उपस्थित होते.
………………….