December 23, 2024

साके येथे हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ बैठकीला उस्फूर्त प्रतिसाद

(साके / प्रतिनिधी)

गेल्या २५ वर्षातील सर्वच विधानसभा निवडणुकीत तुम्ही मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बाजूला होतात. त्यामुळे प्रत्येकवेळी आमचा गेम होत होता, मात्र अन्नपूर्णा साखर कारखाना उभारणीच्या निमित्ताने मंत्री मुश्रीफ यांनी विरोधक असतानाही आम्हाला सर्वतोपरी मदत केली. म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा घेतला निर्णय समरजीत घाटगे तुम्हाला का झोंबतो. असा खडा सवाल माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी केलासाके ता.कागल येथे हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते. त्यावेळी माजी जि प सदस्य मनोज फराकटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

माजी आमदार श्री. घाटगे पुढे म्हणाले, शाहू साखर कारखान्याच्या निवडणूकीत खोटी कागदपत्रे करून माझा अर्ज रद्द करून मला कारखान्यातून बाहेर काढले, शिवाय अन्नपुर्णा पाणी संस्थेची पाणीपट्टी कारखान्याने संस्थेला न देता नुकसान केले. असा आरोप करून घाटगे म्हणाले, पंचक्रोशीतील गावांमध्ये प्रचंड विकासकामे झाल्यामुळे या परिसराचा कायापालट झाला आहे. हसन मुश्रीफ म्हणाले, साके गावातील गर्दी हीच माझ्या विजयाची ऐतिहासिक भुमी ठरणार आहे. कांही महिन्यांपुर्वी याच व्यासपीठावरून संजयबाबा घाटगे यांनी मला जाहिर पाठिंबा देण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहिर केल्याने मला दहा हत्तींचे बळ मिळाले आहे.

मा. जि. प. सदस्य मनोज फराकटे म्हणाले, मतदार संघात मंत्री मुश्रीफांनी केलेली विकासाची कामे भरीव स्वरूपाची आहेत. याशिवाय सर्वसामान्य माणसाला प्रत्येक योजनेचा लाभ मिळाला पाहिजे या भावनेने ते काम करत असतात. म्हणूनच पालक म्हणून त्यांनी घेतलेली जबाबदारी ही माणुसकीच्या नात्याला दृढ करणारी आहे.

यावेळी बाळासाहेब तुरंबे, ज्ञानदेव पाटील, किरण पाटील, सुजय घराळ यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास नानासो कांबळे, सरपंच अंजली कांबळे, सुशिला पोवार, चंदर निऊंगरे, मारूती निऊंगरे, बापूसो पाटील, सी. बी. कांबळे, रविंद्र जाधव, युवराज पाटील, मोहन गिरी, अशोक पाटील, राजू शेंडे आदी उपस्थित होते. अशोक सातुसे यांनी स्वागत तर सुत्रसंचालन टि. एम. सरदेसाई यांनी केले. निलेश निऊंगरे यांनी आभार मानले.

मुश्रीफसाहेब, काळजी करू नका…!

माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, हा परिसर देशभरात श्रीमंत व्हायचा असेलत तर आमदार म्हणून हसन मुश्रीफच पाहिजेत. आम्ही चेहरे पाहून माणसे ओळखतो, मुश्रीफसाहेब तुम्ही काळजी करू नका, आतापर्यंतच्या इतिहासातील उच्चांकी मताधिक्यांनी आम्ही तुम्हाला विजयी करण्याचा निर्धार केला आहे.

माझा लढा प्रवृत्तीविरुद्ध……..!

समरजित घाटगेंचे नाव न घेता मंत्री मुश्रीफ म्हणाले, वडिलांनी काढलेला दुध संघ ज्यांनी विकला, सिद्धनेर्लीतील मातंग समाजाची जमीन काढून घेतली अशा प्रवृत्तीविरोधात माझा लढा आहे. त्यामुळे या तत्त्वाच्या लढाईत कागलची स्वाभिमानी जनता माझी पाठ राखण करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *