December 23, 2024

(बाळेघोल प्रतिनिधी)


तुम्ही मला आशीर्वाद दिला नसता, तर मी आमदार व मंत्रीही झालो नसतो. त्याचबरोबर इतके प्रचंड कामही करता आले नसते. पण; तुम्ही दिलेल्या संधीने मला तालुक्याचे नंदनवन करता आले. हे माझे भाग्य समजतो, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

बाळेघोलसह बेरडवाडी, जैन्याळ येथील प्रचार बैठकीत ते बोलत होते. पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत, सोनूसिंग घाटगे, डी. बी. कांबळे, एकनाथ नार्वेकर, तानाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, ‘२० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मी सातव्यांदा आपल्यासमोर येत आहे. उभ्या आयुष्यामध्ये सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून काम करीत आलो आहे. या जीवावरच या मतदारसंघातील स्वाभिमानी कार्यकर्ते मला प्रचंड मतांनी विजयी करतील, असा विश्वास व्यक्त करीत मंत्री मुश्रीफ म्हणाले, २८ ऑक्टोबर रोजी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, त्यानिमित्ताने इतक्या प्रचंड ताकतीने कागलमध्ये या, की विरोधकांनी जनसागराची गर्दी पाहून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला पाहिजे.’

पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत म्हणाले, ‘मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी चिकोत्रा खो-याचा कायापालट केला आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना उभारून औद्योगिक क्रांतीला चालना दिली आहे. तर सेनापती कापशी येथे सरसेनापती संताजी घोरपडे यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभा करून त्यांचा जाज्वल्य इतिहास उभा केला आहे.’

बाळेघोल येथील सरपंच सिरसाप्पा खतकल्ले, माजी सरपंच शामराव पाटील, आर. एस. पाटील, शामराव तोडकर, शंकरराव माने, अमित नडाळे तर बेरडवाडी येथे विठ्ठल नाईक, पुंडलिक नाईक, परसू नाईक, पिरगोंडा नाईक, पांडुरंग गवाने आदी उपस्थित होते. जैन्याळमध्ये माजी सरपंच परशराम शिंदे, पी. के. पाटील, दिनकर पाटणकर, दिगंबर शेळके आदी उपस्थित होते.

असा आगळा- वेगळा नेता…

डी. बी. कांबळे म्हणाले, ‘मंत्री हसन मुश्रीफ यांनी गेल्या पंचवीस वर्षांमध्ये आपल्या आमदारकी आणि मंत्रीपदाच्या काळात प्रचंड काम केले आहे. मिळालेल्या सत्तेचा वापर गोरगरीब, दिनदलित, वंचित, उपेक्षित लोकांसाठीच केला. या कामाला कोणीच तोड करू शकत नाही. अशा या आगळ्या- वेगळ्या नेत्याला माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी आपल्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्यासह पाठिंबा देऊन त्यांना पुन्हा आमदार करण्याचा चंग बांधला आहे. आम्ही यामध्ये यशस्वी होणारच, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *