आमची बांधिलकी शेतकऱ्यांशी, चिंताही शेतकऱ्यांचीच
(कोल्हापूर / प्रतिनिधी )
आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या नोटिफिकेशनवर त्यांच्या बालिश बुद्धीचे प्रदर्शन केले आहे. याबाबतची त्यांची वक्तव्येही पोरकटपणाचीच आहेत, असा समाचार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे. अशी बालिश व पोररकटपणाची वक्तव्ये करून त्यांनी लोकांच्यात विनाकारण संभ्रम निर्माण करू नये अशी माझी त्यांना सूचना आहे, असेही श्री. मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
प्रसिद्धी पत्रकात मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे, शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासंदर्भात १५ ऑक्टोबर २०२४ रोजी काढलेल्या नोटिफिकेशनच्या सर्व प्रती माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी पत्रकारांना दिलेल्या आहेत. त्या नोटिफिकेशनच्या सर्वच प्रति मी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना पाठवून दिल्या आहेत. खरंतर सतेज पाटील यांना आमदार आणि मंत्री म्हणून अनेक वर्षाचा प्रशासनाचा अनुभव आहे. त्यांनी त्याची शहानिशाही करावी आणि स्वतःची खात्री करून घ्यावी. अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन प्रक्रियेचा तारखांसह तपशीलही सोबत देत आहे. याचाही त्यांनी बारकाईने अभ्यास करावा.
तो असा, ● शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याबाबत कार्यवाही:- @ दि.१०.१०.२०२४ रोजी मा. मुख्यमंत्री महोदय यांची मान्यता प्राप्त झाली. @ दि.११.१०.२०२४ रोजी संचिका अपर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडे आली. @ दि.१२.१०.२०२४ रोजी शनिवार @ दि.१३.१०.२०२४ रोजी रविवार @ दि.१४.१०.२०२४ रोजी संचिका विधी व न्याय विभागाकडे अधिसूचना तपासणीसाठी गेली. @ दि.१५.१०.२०२४ रोजी शासकीय मुद्रणालयामार्फत अधिसूचना रितसर प्रसिध्द करण्यात आली. पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी या पत्रकात पुढे म्हटले आहे, १५ ऑक्टोबरचा निर्णय सांगायला २३ तारीख का लागली यासह कोल्हापुरातून गोव्याला कसे जायचे, असे प्रश्न त्यानी उपस्थित केले आहेत. असले बालिश आणि पोरकटपणाचे प्रश्न त्यांनी करू नयेत.
आम्ही शेतकऱ्यांना सांगितले होते की, कोल्हापूर जिल्ह्यात हा रस्ता होऊ देणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग रद्द करणे ही आमची शेतक-यांशी बांधिलकी आहे. त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग आणि रद्द केलेला आहे, यापुढे तो कधीही होऊ देणार नाही. इतर जिल्ह्यात ज्यांना हा रस्ता नको असेल तिथले लोक तो विषय बघतील.
त्यांना चिंता गोव्याची…….!
श्री. मुश्रीफ यांनी म्हटले आहे, कोल्हापूर जिल्ह्यात आम्हाला हा रस्ता नको आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यापुरता तो रद्द झाला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केली हे वाक्य वापरण्यापूर्वी त्यांनी शंभरवेळा विचार करायला हवा होता. तसेच; हसन मुश्रीफ असे करू शकतात काय, याबाबतही विचार करायला हवा होता. कारण; आम्हाला चिंता आहे शेतकऱ्यांची तर त्यांना चिंता गोव्याला जाणाऱ्यांची, असा चिमटाही श्री. मुश्रीफ यांनी काढला आहे.