(विशेष वृत्त /समाधान म्हातुगडे )
कागलच्या राजकीय विद्यापीठात महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी निश्चित झाली आहे. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रावादी च्या शरदचंद्र पवार गटाकडून समरजित घाटगे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. तालुक्यातील माजी आमदार संजय घाटगे गटाने मंत्री मुश्रीफांना अगोदरच पाठिंबा दिला आहे तर शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी युती धर्म म्हणून मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबर राहण्याचा निर्धार केला असला तरी त्यांचेच पुत्र अॅडव्होकेट विरेंद्र मंडलिक यांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या वडिलांना राजे व मुश्रीफ गटाने धोका दिल्याचे सांगत प्रचंड भयंकर आरोप केले त्यामुळे मंडलिक गट या निवडणुकीत केंद्रस्थानी आला असून त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. साहजिकच यामुळे मंडलिक गटच या निवडणुकीत ‘ किंगमेकर ‘ ठरण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील राजकीय वातावरण निवडणुकीपूर्वीच तापले आहे, त्यातच मंडलिक गटाने नवी ट्विस्ट आणला. मंडलिक गटाला संपवण्याचे काम मुश्रीफ व राजे गटाने केले, असे उदाहरणासहीत आरोप करत अॅडव्होकेट विरेंद्र मंडलिक यांनी गावोगावी ‘ मुश्रीफ साहेब, राजे साहेब काय काय केले तुम्ही, विसरणार नाही’ आम्ही असे डिजिटल फलक लावले. त्यामुळे एकूणच सगळ्यांना संभ्रमावस्था आणि गोंधळ निर्माण झाला. त्यामुळेच मंडलिक गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोन्ही ही उमेदवारांकडून गटाच्या फसवणूकीचा आरोप केला आहे . त्यामुळे त्यांना कोणतीतरी एक भूमिका घ्यावी लागेल. सध्या संजय मंडलिक मुश्रीफांच्या व्यासपीठावर दिसत आहेत तर त्यांचेच पुत्र आरोप करून पुन्हा कोणत्याही राजकीय कार्यक्रमात दिसलेले नाहीत त्यामुळे मंडलिक गटाच्या भूमिकेकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष्य लागले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निष्ठावंत असलेले माजी खासदार संजय मंडलिक हे शिंदे यांचा शब्द पाळून युती धर्म स्वीकारतील. पण लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे खच्चीकरण झालेल्या मंडलिक गटाचे राजकीय पुनवर्सन करून गटाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी विरेंद्र मंडलिक प्रयत्न करत आहेत . गटाचे उगवते नेतृत्व असलेले विरेंद्र मंडलिक यांना सन्मानाचे स्थान दिले तर ते विधानसभा निवडणुकीत थांबू शकतात. त्यामुळे महायुतीचे हसन मुश्रीफ व महाविकास आघाडीचे समरजित घाटगे यांच्यात लढत होईल. यामध्ये लोकनेते स्व.सदाशिवराव मंडलिक यांनी कार्यकर्त्यांचे गावोगावी जाळे पसरले आहे. त्यामुळे हा मंडलिक गट कोणाला पाठिंबा देणार यावरतीच कागलचा ” आमदार ” ठरणार हे निश्चित आहे.