December 22, 2024

राधानगरी / प्रतिनिधी


राधानगरी मतदार संघ विकासाच्या ट्रॅक वर आलेला आहे. पुढील पाच वर्षात राज्यात उत्कृष्ट मतदारसंघ करण्यासाठी मला साथ द्या असे आवाहन आमदार प्रकाश आबीटकर यांनी केले. ते राधा नगरी येथे झालेल्या जाहीर सभेत बोलत होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठा जनसागर उसळला होता. राधानगरी शहरात अक्षरश: गर्दीचा महापूर आला होता. लहानापासून आबालवृदृधांपर्यंत लोक अक्षरशः बेभान होऊन आमदार प्रकाश आबीटकर यांचा एकच जयघोष करत होते.

आमदार आबिटकर म्हणाले, आयुष्यात काय मिळाले असेल तर आजचा भाग्याचा दिवस. मी कोणाला नोकरी दिली नाही. चिठ्ठी दिली नाही. फक्त आणि फक्त विकासाचे राजकारण केले. कामे पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान केले. लोकांत राहिलो त्यामुळेच माणसं वेड्यासारखी, बेभान होवून माणसांचे जथ्थेच्या जथ्थे विजयी संकल्पात सहभागी होत आहेत. मतदार संघातील ७० टक्के धनगर वर वाड्यावर लाइट पोहचवली. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य यासारख्या विकास कामाबरोबरच ८० हजार लाडकी बहीण, १० हजार लोकाना वयोश्री योजनेचा लाभ मिळवून दिला. योजना शासनाच्या असल्या तरी आणणारा आमदार तुमचा होता. पुढील दहा पिढ्या नाव राहिल असे काम करुया. आमदार केवळ फंडापुर्ता न गाड्यावर काम करणारा असला पाहिजे. सर्वांच्या साक्षीने इतिहास घडविणाचे काम करुया.

माजी खासदार संजयसिंह मंडलिक म्हणाले, राधानगरीत गर्दीचा महापूर उसळला असून आजचा अथांग जनसागर हा आमदार प्रकाश आबीटकर यांच्या वीजयाची नांदी आहे. त्यानी विकासाची गंगा खेडोपाड्यावर नेऊन पोचवली. विकास म्हणजे काय हे आमदार आबीटकरांनी दहा वर्षात जनतेला दाखवून दिले आहे. त्यामुळे आमदार प्रकाश आबीटकर एक लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आरपीआयचे राज्य सचीव प्रा.शहाजी कांबळे म्हणाले राधानगरी मतदार संघात गावागावात बौद्ध विहाराची स्थापना करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार पोहोचविला आहे. मतदार संघातील सर्व आंबेडकरी जनता आमदार आबीटकर यांच्या ठामपणे पाठीशी राहिल.

भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथांजी पाटील म्हणाले, आज उसळलेली गर्दी ही आमदार आबीटकर यांची विजयाची सभा असल्याचा भास होत आहे. दहा वर्षापूर्वीचा इतिहास व आमदार आबीटकर यांच्या आमदारकीच्या काळातील दहा वर्षचा विकास पहा. आमदार आबिटकर यांनी स्वत:ला झोकून देऊन विकास कामांचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे विरोधकांना मते मागण्याचा अधिकारच नाही.

यावेळी ज्येष्ठ नेते केजी नांदेकर गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, दत्तात्रय उगले कल्याण निकम, नंदकुमार सुर्यवंशी, अशोक फराकटे, अशोक पाटील, रविश पाटील, संभाजी आरडे, अभिषेक डोंगळे, बाळासाहेब नवणे तानाजी चौगले, विजय महाडीक, नामदेव चौगुले, संदीप वरंडेकर, धैर्यशील भोसले, विद्याधर परीट, सुभाष जाधव, व्ही. टी. जाधव, विलास रणदिवे,संग्राम पाटील, दीपक शेट्टी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

………………………..
लोकांची त्सुनामी…
आमदार प्रकाश आबीटकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उसळलेल्या लोकांच्या गर्दीच्या त्सुनामीत लोक डोक्यावर भगवी टोपी, हातात भगवा झेंडा, गळ्यात स्कार्प आणि प्रकाश आबीटकर यांचा जयघोष करून बेभानपणे नाचत होते. यामध्ये महिलाही आघाडीवर होत्या. राधानगरी शहर अक्षरशा गर्दीने फुलून गेले होते त्यामुळे राधानगरीत लोकांच्या गर्दीची त्सुनामीच आल्याचा भास होत होता.
…………………..
40 हजार लोकांच्या साक्षीने अर्ज दाखल…..
आमदार आबीटकर यांचा राधानगरी येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सुमारे 15 किलोमीटर मोटरसायकल आणि चार चाकी वाहनांची रांग लागली होती. 40 हजारांच्या या जनसागरात लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय होती. 2014, 2019 च्या गर्दीचे सर्व उच्चांक यावेळच्या गर्दीने मोडून काढले.
…………………………
आमदार प्रकाश आबीटकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राधानगरीत शहरात लोकांच्या गर्दीची उसळलेली त्सुनामी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *