धामणे / प्रतिनिधी
जनतेचे पाठबळ आणि माजी खासदार संजयदादा मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या पाठिंब्यासह आपणाला मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून आपण एक लाखाहून अधिक मतांनी विजयी होणार, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला
धामणे ता. आजरा येथे जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. आजरा साखर कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, शिरीष देसाई, दीपक देसाई, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य काशिनाथ तेली, भाजपाचे स्वागत परुळेकर, गणपतराव सांगले, शिवाजी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी सरपंच बाळासाहेब धामणकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मंत्री मुश्रीफ यांना विकास कामासाठी जाहीर पाठिंबा दिला.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या परिसरात सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना होताना हवाई अंतर सर्व बाजूंनी धामणे व बेलेवाडी काळमाच्या दरम्यानच डोंगरावरती आले. हे एक आव्हान म्हणून आपण हा साखर कारखाना उभा केला, आणि या परिसराचेच संपूर्ण भाग्य उजळले आहे. धामणे – बेलेवाडी काळम्मा, पिंपळगाव या परिसरात सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या रूपाने औद्योगिक क्रांतीला चालना देण्याचे काम झाले आहे. उतूरपासून सर्व परिसर सुजलाम-सुफलाम होताना दिसत आहे. याबरोबरच या भागामध्ये सर्व विकासाचे काम मोठ्या प्रमाणात झाली आहेत. त्यामुळे या परिसराचा कायापालट झाला आहे.
विरोधकांच्या नुसत्याच बढाया……..!
माजी सरपंच महादेवराव पाटील म्हणाले, विरोधी उमेदवार विकास खुंटल्याचा आरोप करीत आहेत. मग त्यांनी विकासाचे तर सोडाच. या भागाशी संपर्क किती ठेवला आहे? ते तरी सांगावे… विरोधी उमेदवारांनी एकाच व्यासपीठावर येऊन आपण केलेले काम सांगावे आणि त्यानंतरच मुश्रीफ साहेबांच्यावर बोलावे, नुसत्याच बढाया मारू नयेत, असेही पाटील म्हणाले.
……………..