कागल / प्रतिनिधी
सिद्धनेर्ली (ता. कागल ) येथील दलित समाजाची जमीन समरजीत घाटगे यांनी काढून घेतल्याचे प्रकरण सबंध दलित समाजाचे रक्त खवळून उठविणारे आहे. कारण; राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वारसा सांगणाऱ्या समरजीत घाटगे यांनी दलितांना फसविले आहे, असा घनघात आर. पी. आय. चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केला. भूमिहीन, बेसहारा होऊन संसार उघड्यावर पडलेल्या दलित समाजाचा समरजीत घाटगे यांना तळतळाट लागेल. ज्या- ज्या वेळी दलित समाज पेटून उठतो त्या -त्यावेळी क्रांती होते, असा इशाराही त्यांनी दिला.
कागलमध्ये पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ आयोजित दलित समाजाच्या संकल्प मेळाव्यात श्री. कांबळे बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत माजी प्राचार्य डाॅ. अच्युत माने होते.
भाषणात श्री. कांबळे पुढे म्हणाले, समरजीत घाटगे, तुम्हाला नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या कामांची बरोबरी संपूर्ण आयुष्यभर करता येणार नाही. नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्यामुळेच इथला सर्वसामान्य गरीबातला गरीब झोपडपट्टीतला माणूस सुरक्षित जगतो आहे. याउलट; समरजीत घाटगे यांनी मात्र गोरगरिबांच्या ताटात माती कालवण्याचं काम केलेलं आहे.
पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणाले, दलित समाजातील गंगाराम कांबळेला रोजगार निर्मितीसाठी हॉटेल काढून देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज कुठे आणि त्यांचाच जनक घराण्याचा वारसा सांगत दलित समाजाची जमीन काढून घेणारे समरजीत घाटगे कुठे? सिद्धनेर्लीतील दलित समाजाला शंभर वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी दिलेली जमीन समरजीत घाटगे यांनी काढून घेण्याचे प्रकरण अत्यंत वाईट आणि घृणास्पद आहे. १९५६ साली कुळकायदा तयार झाला. त्या आधीपासूनही हे शेतकरी संरक्षित कुळ म्हणून नोंद होते. काहीही होऊ दे. या गरीब भूमिहीन दलित समाजाला मी जमीन मिळवून देणारच आणि नाही मिळवून देऊ शकलो तर ती विकत घेऊन देणार, अशी प्रतिज्ञाही श्री. मुश्रीफ यांनी केली.
माजी प्राचार्य डाॅ. अच्युत माने, भैय्या माने , बी. आर. कांबळे, चंद्रशेखर कोरे यांनी मनोगतं व्यक्त केली. रविराज शिंदे, सचिन मोहिते, कृष्णात कांबळे, सचिन मोहिते, आणणासो आवळे, साताप्पा हेगडे आदी उपस्थित होते.
वैभव प्रधान यांनी सुत्रसंचलन केले.
छत्रपती शाहूंचा विचार महाराष्ट्रभर पोहोचविला….!
श्री. कांबळे म्हणाले, चळवळीच्या आणि पक्षीय संघटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या- ज्यावेळी मी संबंध महाराष्ट्रभर फिरतो. त्यावेळी माझ्या कागल तालुक्याचा उल्लेख करून लोक मला विचारतात, तुम्ही मुश्रीफसाहेबांच्या मतदारसंघातले आणि तसेच ते मुश्रीफ साहेबांच्या जनसेवेची आणि वैद्यकीय सेवेची आवर्जून चर्चा करतात प्रत्यक्षात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा विचार त्यांनी महाराष्ट्रभर पोचवून कागल चा नावलौकिक वाढविला आहे त्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा उर अभिमानाने भरून येतो.
चार्टर्ड अकाउंटंट असल्याने हिशोब फार कळतो…..
श्री. मुश्रीफ म्हणाले, ही जमीन श्रीमंत बापूसाहेब महाराज, श्रीमंत बाळ महाराज, श्रीमंत विक्रमसिंहराजे घाटगे या सगळ्यांच्याच नावावर त्या -त्या कालखंडात होती. त्यांनी कधीही या संरक्षित कुळाला त्रास दिला नाही आणि जमीन दुसऱ्याच्या नावानेही केली नाही. परंतु; जमीन वारसाहक्काने समरजीत घाटगे यांच्या नावावर होताच ही जमीन का काढून घेतली? समरजीत घाटगे चार्टर्ड अकाउंटंट असल्याने त्यांना हिशोब फार चांगला कळतो, असेही ते म्हणाले.