कोल्हापूर / प्रतिनिधी
मराठा योद्धे मनोज जरांगे यांना अपेक्षित असलेल्या मराठा आरक्षणाला माझा जाहीर पाठिंबा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे हीच माझी आग्रही भूमिका आहे, असे प्रसिद्धी पत्रक वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धीला दिले आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी या पत्रकात म्हटले आहे. मनोज जरांगे यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी या प्रसिद्धी पत्रकासह व्हिडिओ जारी करून स्टॅम्प पेपरवर लिहून देत असल्याचेही श्री. मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
सोमवार दि. ३ मराठा योद्धे श्री. मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत जे उमेदवार मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारा व्हिडिओ जारी करून आणि स्टॅम्पवर लिहून देतील त्यांना पाठिंबा दर्शवण्याची भूमिका मांडली. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वप्रथम हसन मुश्रीफ यांनी ही भूमिका घेतली आहे.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही आपली आग्रही भूमिका यापूर्वीही नेहमीच राहिली आहे. यापुढेही मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे हीच भूमिका आग्रही असेल. आजपर्यंत मराठा आरक्षणासाठी झालेल्या मराठा समाजाच्या सर्व आंदोलनांमध्ये, उपोषणामध्ये मी अग्रभागी राहिलो आहे. तसेच; एक मराठा लाख मराठा या मोर्चामध्येही मी हिरीरीने सहभागी झालो आहे, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.