December 23, 2024

कागल / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत समरजीत घाटगे यांनी स्वतःचा पूर्ण गटच विरोधकांच्या दावणीला बांधून प्रा. संजयदादा मंडलिक यांचा मोठा विश्वासघात केला. या विश्वासघाताचा बदला मंडलिकप्रेमी विधानसभा निवडणुकीत घेतील, असा इशारा कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर यांनी दिला. यापूर्वी मंडलिक- मुश्रीफ गटात जे झाले ते गंगार्पण करून नवीन अध्याय लिहायचे ठरले आहे, असेही ते म्हणाले.

कागलमध्ये पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रभाग क्रमांक सात, आठ व नऊमधील मतदारांच्या संपर्क बैठकीत श्री. गाडेकर बोलत होते.

श्री. गाडेकर पुढे म्हणाले, समरजीत घाटगे यांना मी आव्हान देतो की, तुम्ही स्वर्गीय खासदार कै. सदाशिवराव मंडलिकसाहेब व आमचे नेते पालकमंत्री नामदार श्री. मुश्रीफसाहेब यांच्या संघर्षकाळामधील वक्तव्ये छापून मंडलिक गटाची मने कलुषित करून गैरसमज पसरवू नका. झाले गेले ते गंगार्पण करून दोन्ही गटांनी नवीन अध्याय लिहायचे ठरले आहे. तुम्ही गहिनीनाथांची शपथ घेऊन सांगा की, तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रा. संजयदादा मंडलिक यांना मते द्या व विजयी करा, असा उल्लेख कोणत्या भाषणात केला होता. लोकसभेला शिवसेना- शिंदे गटाकडून सात कोटी रुपये आणून ते तसेच दाबून ठेवले आणि आता विधानसभेला ते वर काढलात. त्यांनी आपल्या चुलते प्रवीणसिंह घाटगे यांना छत्रपती शाहू महाराजांचा प्रचार करायला सांगून त्यांनी पूर्ण गट प्रा. संजयदादा मंडलिक यांच्या विरोधात घालविला, हे पूर्ण तालुका आणि जिल्हाही जाणतो. एवढेच नाही; तर समरजीत घाटगे यांना मंडलिक यांच्या बाबतीत प्रेमच आहे तर शिंदेवाडीच्या मंडलिक यांच्या शाळेच्या इमारतीबाबत कोर्टात का गेले? समरजीत घाटगे, मंडलिक गटाला ही वस्तुस्थिती माहिती आहे. उगाच शिळ्या कडीला उत आणू नका.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ज्या विश्वासाच्या भावनेने श्री. घाटगे व सौ. घाटगे यांनी गटात प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तडा आम्ही जाऊ देणार नाही. घाटगे कुटुंबीय व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठीशी मी खंबीर उभा राहीन.

राजे बँक रसातळाला नेत आहेत…….

राजे विक्रमसिंह घाटगे कागल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या विद्यमान संचालिका सौ. कल्पना दिलीपराव घाटगे, कागल नगरपालिकेचे माजी शिक्षण मंडळ सभापती श्री. दिलीपराव संभाजीराव घाटगे व श्री. अजिंक्य दिलीपराव घाटगे यांनी समरजीत घाटगे यांच्या गटाला कंटाळून पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ गटात प्रवेश केला. श्री. दिलीपराव घाटगे म्हणाले, मी गेली ४० वर्षे त्यांचा कार्यकर्ता होतो. परंतु; तिकडे कार्यकर्त्याला कधीच किंमत दिली जात नाही. त्यांना पैशाची लालच तर फार मोठी आहे. राजे विक्रमसिंह घाटगे कागल को-ऑपरेटिव बँकेचा राजकीय अड्डा बनवल्यामुळे बँक रसातळाला जाईल, अशी वाईट अवस्था आहे. राजकीय स्वार्थापोटी तिथे जी नोकरभरती झाली आहे, ती तर सांगण्याच्या पलीकडे आहे. शेकडो बेरोजगार युवकांना नोकऱ्यांची अमिषे दाखवून पाच- सहा हजार पगाराच्या पिग्मी एजंटच्या ऑर्डर्स देत आहेत. या सगळ्या पापात वाटेकरी व्हायला नको या विचारांतूनच राजीनामा दिला आणि मुश्रीफ गटात प्रवेश केला, असेही ते म्हणाले.

यावेळी प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, चंद्रकांत गवळी, बाबगोंडा पाटील, नवल बोते, संजय ठाणेकर, अमित पिष्टे, ॲड. संग्राम गुरव, योगेश कदम आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *