December 22, 2024

कागल / प्रतिनिधी

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सिद्धनेर्ली ता. कागल येथील दलित समाजाला शंभर वर्षांपूर्वी पोट भरून कसून खाण्यासाठी साडेपाच एकर जमीन दिली होती. ती जमीन समरजीत घाटगे यांनी दहशत, दडपशाही अशा अन्यायी मार्गाने काढून घेतली आहे. दलितांवरील हे अत्याचाराचे हे प्रकरण आम्हा तमाम दलित समाजाचे रक्त खवळून उठविणारे आहे. या विधानसभा निवडणुकीत दलित समाजावर समरजीत घाटगेंनी केलेल्या अन्यायांचा बदला घ्या, असे आवाहन कागलचे माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे यांनी केले.

कागलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ आयोजित संपर्क सभेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, नवल बोते, मंडलिक गटाचे जेष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत गवळी, बाबगोंड पाटील, तात्यासाहेब पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुठे राजर्षी शाहू महाराज आणि कुठे हलकट समरजीत घाटगे….?
श्री. कांबळे पुढे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक एकोप्यासाठी गंगाराम कांबळे यांना हॉटेल काढून दिले होते. त्या रूपाने त्यांना रोजगार देणारे राजर्षी शाहू महाराज कुठे आणि त्यांच्या जनक घराण्याचा वारसा सांगत दलितांना भूमिहीन करून त्याला देशोधडीला लावून त्यांचे संसार मोडणारे समरजीत घाटगे कुठे?

व्रत अनवाणी पावलांचे…..! पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या विक्रमी मताधिक्यांच्या विजयासाठी अजितराव कांबळे, विकी कांबळे, पारस कांबळे या कार्यकर्त्यांनी निकालापर्यंत चप्पल न घालण्याचे व्रत केले.

या कार्यक्रमात राजे विक्रमसिंह घाटगे कागल को-ऑपरेटिव बँकेचे माजी कर्मचारी कै. राजेंद्र भरमकर यांचे चिरंजीव विशाल भरमकर व भरमकर कुटुंबीयांनी राजे गटातून मुश्रीफ गटात प्रवेश केला. यावेळी सौरभ पाटील, रोहित पाटील, विवेक लोटे, भगवान कांबळे, गणेश कांबळे, तुषार भास्कर, सुरज कामत, बच्चन कांबळे आदी उपस्थित होते.

दिवसभरात प्रभाग क्रमांक आठ व नऊ, धनगर गल्ली, दूधगंगा काळम्मावाडी वसाहत, अनंत रोटो परिसर, सोमवार पेठ येथेही प्रचार बैठका झाल्या.
………….

कागल- डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील संपर्क बैठकीत बोलताना माजी नगराध्यक्ष अजित कांबळे, पालकमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित नागरिक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *