.
मुरगुड, /प्रतिनीधी
मुरगुडमध्ये शुक्रवारी दि. १५ होणारी सभा अशी विक्रमी आणि ऐतिहासिक करा कि विरोधकाला धडकीच भरली पाहिजे, असा इशारा माजी खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांनी दिला. माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील म्हणाले, पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या योगदानातूनच ग्रामदैवत श्री. अंबाबाई देवीचे घडीव शिल्पकलेचे मंदिर साकारले आहे. मंत्री श्री. मुश्रीफ यांना मत म्हणजे साक्षात ग्रामदैवत अंबाबाईला मत.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ मुख्य बाजारपेठेतून श्री. मुश्रीफ यांच्यासह माजी खासदार संजयदादा मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील व ॲड. वीरेंद्रसिंह मंडलिक यांच्या उपस्थितीत भव्य रॅली निघाली. ग्रामदैवत श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन रॅलीची सांगता व जाहीर सभा झाली.
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ग्रामदैवत श्री. अंबाबाई देवीच्या इतक्या सुंदर मंदिरासाठी मला भरपूर निधी देता आला, हे माझे भाग्य आहे. मुरगुडकरांनी आपली सर्व शक्ती एकत्र करून मला इतके प्रचंड मताधिक्य द्या की, विरोधी उमेदवाराचे धाबे दणाणले पाहिजेत. महाआघाडीची सत्ता एकत्र असताना प्रा. संजय मंडलिक आणि आपण मंदिर आणि मुरगुड शहराच्या विकासासाठी प्रचंड निधी मिळवू शकलो. मतदारसंघासाठी सात हजार कोटी रुपयांचा निधी आणला. आज सर्व कामांच्या पुण्याईवर तुमचा आशीर्वाद मागायला आलो आहे.
माजी खासदार संजयदादा मंडलिक म्हणाले, शुक्रवारी दि. १५ मुरगुडात होणाऱ्या आमच्या सभेने पालकमंत्री श्री. मुश्रीफसाहेब यांचा विक्रमी आणि ऐतिहासिक मताधिक्यांचा विजय स्पष्ट होईल. मुरगुड शहरातील सर्व कामे पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी मार्गी लावली. विरोधी उमेदवारांनी एकही काम केले नाही. त्यामुळे सर्व ताकदीनिशी कामाला लागावे. प्रत्येक घरा-घरात जाऊन प्रचार करून मुश्रीफसाहेबांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून आणावे. मला लोकसभेला पडलेल्या मताधिक्यापेक्षाही जादा मते मंत्री मुश्रीफ यांना पडली पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रास्ताविकपर भाषणात माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील म्हणाले, पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्यामुळे ग्रामदैवत श्री. अंबाबाई देवीचे घडीव शिल्पकलेतील मनोहारी मंदिर साकारले आहेच. मुरगूड शहराच्या विकास कामानांही त्यांनी भरपूर निधी दिला आहे. आपण सर्वजण एकसंघ बनवून एकमुखाने त्यांची पाठराखण करूया…….!
एक लाखाची ओटीभरणी……
प्रा. संजयदादा मंडलिक म्हणाले, लोकसभेला मला मुरगुडमधून १,८०० मताधिक्य आहे. ते पार करून त्यापेक्षा अधिक मताधिक्य मिळवा. आपण ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीच्या चरणी एक लाखाची ओटीभरणी अर्पण करू.
एक मत अंबाबाईसाठी…!
गेली अनेक वर्षे ग्रामदैवत अंबाबाई मंदिराचे काम रखडले होते. मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी या मंदिराच्या पूर्तत्वासाठी प्रचंड निधी दिला. त्यामुळेच मंदिर पूर्ण झाले. म्हणूनच; या अंबाबाई देवीसाठी एक मत हसनसाहेब मुश्रीफ यांना प्रत्येकाने द्या, असे भावनिक आवाहन केले.
स्वागत माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांनी केले. प्रास्ताविक प्रवीणसिंह पाटील यांनी केले.
यावेळी सुहास खराडे, रणजीत सूर्यवंशी, शशिकांत खोत, दिगंबर परीट, बाजीराव गोधडे, जयसिंग भोसले, शिवाजी चौगुले, धनाजी गोधडे आदी उपस्थित होते.
………..