December 23, 2024

कागल/प्रतिनिधी

शाहू साखर कारखान्याने या हंगामात सल्फरलेस साखर व शाहू पोटॅश या दोन नवीन प्रकल्पाची उभारणी पूर्ण केली आहे.तसेच इथेनॉल व सहवीज निर्मिती या दोन प्रकल्पांचे विस्तारीकरणाचे काम ही पूर्ण केले आहे.
एकाच हंगामात अशा चार प्रकल्पांचे काम नियोजित वेळेत यशस्वीपणे पूर्ण केले आहे हेच ‘शाहू’ चे वेगळेपण
आहे असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

कारखान्याच्या को जनरेशन विस्तारीकरण प्रकल्प अंतर्गत नवीन उभारलेल्या ७५ टनी बॉयलर अग्नि प्रदिपन सोहळा
राजे समरजितसिंह घाटगे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.नवोदिता घाटगे यांच्या हस्ते विधीवत संप्पन्न झाला.
यावेळी ते बोलत होते.यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नवीन बॉयलरचे काम वेळेत व यशस्वीपणे पूर्ण केलेबद्धल सिटसन् इंडिया कंपनीचे प्रतिनिधी प्रोजेक्ट मॅनेजर राजेंद्र दळवी व जनरल मॅनेजर मलिक नदाफ यांचा कारखाना प्रशासनाच्या वतीने सत्कार केला.

राजे समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले,शाहूने सुरू केलेल्या नवीन प्रकल्पांचे नियोजन वीस वर्षापूर्वी स्व. राजेसाहेब व कारखान्याच्या अध्यक्षा आईसाहेब यांनी केलेल्या ब्राझील दौऱ्यानंतर केले होते. टप्याटप्याने स्व.राजेसाहेब यांचे ते संकल्पित प्रकल्प आता यशस्वीपणे पूर्ण होत आहेत. विस्तारिकरणाचे काम नियोजनानुसार वेळेत पूर्ण होणे, आर्थिक व वेळेच्या दृष्टीने फायद्याचे आहे. याचे सर्व श्रेय अधिकारी व कर्मचारी याना जाते.

प्रास्ताविकात कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले, केंद्र सरकारच्या इथेनॉल निर्मितीचे पुरक धोरणांचा फायदा घेणेसाठी कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती क्षमतेत दैनंदिन ६० हजार लिटरवरून ९० हजार लिटरपर्यंत व आत्ता ९० हजार वरून दैनंदिन १ लाख ८० हजार लिटर्स पर्यंत असे विस्तारीकरण तर सहवीज प्रकल्पाची क्षमता २१.५ मेगावॕट वरून ३४ मेगावॕट अशी केली आहे. बिगर हंगाम काळात वीज विक्री दैनंदिन ५ मेगावॕटपर्यंतच करणार आहोत जेणेकरून हे प्रकल्प स्वतःचे बगॕसवर चालावेत .नविन इथेनाॕल निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र शासन व राज्य शासनाच्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत. केंद्र सरकारने परवानगी देताना काही अटी घातल्या आहेत. पैकी प्रमुख अट म्हणजे सध्या डिस्टीलरीचे सांडपाणी आणि प्रेसमड वापरून दर्जेदार कंपोष्ट खत निर्मिती करत होतो ती बंद करावी आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याची पावडर करावी. त्याप्रमाणे आपण स्पेंटवाॕश ड्रायरची उभारणी पुर्ण केली असून सोबत ग्रेन्युलेशन प्लँटही उभा केला आहे. या पावडरमध्ये पोटॕशचे प्रमाण १६% पेक्षा जास्त आहे त्यामुळे रासायनिक पोटॕशला
हे दाणेदार खत उत्तम पर्याय ठरेल.

कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री व ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील, सर्व संचालक, शाहू ग्रुप मधील विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद शेतकरी पुरवठादार उपस्थित होते.

आभार संचालक युवराज पाटील यांनी मानले

अद्यावत तंत्रज्ञान वापरण्यात शाहू अग्रभागी

कारखाना चालवताना बदलत्या परिस्थितिनुसार कारखान्यात नवनवीन व अद्यावत तंत्रज्ञान आणण्यासाठी स्व.राजेसाहेब आग्रही होते. त्यांच्या शिकवणीनुसार नवीन प्रकल्प उभारताना तसेच जुन्या प्रकल्पाचे विस्तारीकरण करताना अद्यावत तंत्रज्ञान वापरास प्राधान्यक्रम दिलेने आपला कारखाना 45 वर्षांपूर्वीचा जुना असला तरी अद्यावत तंत्रज्ञान वापरण्यामध्ये अग्रभागी आहे. असे कार्यकारी संचालक यांनी स्पष्ट केले.

कागल येथे श्री छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या को जनरेशन विस्तारीकरण प्रकल्प अंतर्गत नवीन उभारलेल्या ७५ टनी बॉयलर अग्नि प्रदिपन सोहळ्यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व
त्यांच्या सुविद्य पत्नी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे,शेजारी कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *